पिंपरीतील 'मेकॅनिक वूमन'ची बातच न्यारी; पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सांभाळतात 'लालपरी'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 01:21 PM2021-03-08T13:21:34+5:302021-03-08T13:29:38+5:30
महिला शिक्षणाचा प्रसार झाला आणि सर्वच क्षेत्रात महिला, पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागल्या. एसटी महामडळामध्येही अशीच क्रांती झाली आहे.
पिंपरी : बसचे स्पिंग बदलणे, क्लचप्लेट बदलणे, टायर बदलणे यांसारखी अवजड कामे पुरूष मेकॅनिकच करू शकतात, असे चित्र काही वर्षापूर्वी होते. परंतु बदलत्या काळानुसार यात बदल झाला आहे. एसटी महामंडळात पुरूष मेकॅनिकच्या खांद्याला खांदा लावून महिला मेकॅनिकही रोज ही अवजड कामे करीत आहेत. पिंपरीतील वल्लभनगर आगारात सध्या चार महिला मेकॅनिक बस दुरूस्तीचे काम करतात.
महिला दिनानिमित्त या महिला मेकॅनिकशी संवाद साधला असता, त्या म्हणाल्या की, सुरूवातीला माहिती नव्हतं की एसटी महामंडळात नेमक काय काम कराव लागत. जेव्हा प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली. तेव्हा रोज स्पिंग बदलणे, क्लचप्लेट बदलणे, टायर बदलणे, ऑईल बदलणे, ग्रिसीगं करणे, ही अवघड कामे महिलांनी कशी करायची असा प्रश्न पडला होता. परंतु आता या कामाची सवय झाली आहे. शिल्पा वानखडे, राधा विभूते, रेखा जाधव, वंदना गायकवाड या चार महिला मेकॅनिक सध्या वल्लभनगर आगारात काम करीत आहेत.
महिला शिक्षणाचा प्रसार झाला आणि सर्वच क्षेत्रात महिला, पुरुषांच्या बरोबरीने काम करू लागल्या. एसटी महामडळामध्येही अशीच क्रांती झाली आहे. एसटीमध्ये क्लार्क, अधिकारी अगदी कंडक्टरपदीही महिला कार्यरत आहेत. काही वर्षापूर्वी एसटी चालक आणि एसटीच्या मेकॅनिक विभागात मात्र पुरुषांचीच मक्तेदारी होती. मात्र मागील काही वर्षांपासून एसटीने महिला मेकॅनिकची एसटी महामंडळात भरती केली आहे. त्यामुळे महिला या क्षेत्रात कमी करण्याची संधी मिळाली.
--
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा
पुरूष मेकॅनिकच्या बरोबरीने महिलांनाही अवजड कामे करावी लागतात. एसटी महामंडळाच्या गॅरजे मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला. नवीन अत्याधुनिक मशीन आल्या तर अवघड असणारी कामे सोपी होतील. अनेक महिला या अवघड कामांमुळे या क्षेत्रात येत नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला तर महिला मेकॅनिकांना त्यांची मदत होईल व महिला या क्षेत्रात येतील, अशा भावना महिला मेकॅनिकांनी व्यक्त केल्या आहेत.
--
चार वर्षापासून एसटी महामंडळात मेकॅनिक म्हणून काम करीत आहे. सुरूवातीला हे जमल की नाही, असे वाटले होते. परंतु आता सवय झाली आहे. क्लचप्लेट बदलणे, गिअर बॉक्सची कामे, टायर उचलणे, बसचा मेन्टन्स. ही सर्व कामे महिला मेकॅनिक करतात. सध्या करत असलेल्या काम बद्दल समाधानी आहे.
रेखा जाधव, महिला मेकॅनिक, वल्लभनगर आगार