सात-बारा हाताने लिहून द्यावा : सुप्रिया सुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 09:00 PM2018-06-18T21:00:09+5:302018-06-18T21:00:09+5:30
तांत्रिक अडचणीवर पुढील पंधरा दिवसांत तोडगा न निघाल्यास तलाठ्यांनी हाताने सात-बारा लिहून द्यावेत..
पुणे : सर्व्हर बंद असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सात-बारा उतारा मिळण्यास अडथळे येत असून त्यामुळे कर्ज वाटप प्रक्रियेला अडचणी येत आहे. संगणकीय प्रणाली व्यवस्थित काम करत नाही तोपर्यंत तलाठ्याने हाताने लिहिलेला सात-बारा सुरु करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासमवेत सुळे यांनी बैठक घेतली. बारामतीसह दौंड, इंदापूर, पुरंदर तालुक्यातील नागरी समस्या, सिंहगडावरील स्टॉलधारकांच्या समस्या तसेच पुण्यातील रिंगरोडबाबत स्थानिक शेतकऱ्यांच्या हरकतीबाबत या बैठकीत चर्चा झाली. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, अप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे, सुनील चांदेरे, रणजीत शिवतरे, सचिन दोडके, शुक्राचार्य वांजळे या वेळी उपस्थित होते.
सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने सात-बारा उतारा मिळत नाहीत, अशी कारणे त्या त्या गावच्या तलाठ्यांकडून देण्यात येत आहेत. तांत्रिक अडचणीवर पुढील पंधरा दिवसांत तोडगा न निघाल्यास तलाठ्यांनी हाताने सात-बारा लिहून द्यावेत. त्यामुळे कर्जप्रकरणे अडकून राहणार नाहीत, अशी सूचना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष थोरात यांनी मांडली. त्यावर सकारात्मक विचार करावा, असे सुळे यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथील सबस्टेशन, पुरंदर तालुक्यातील जेऊर फाटा रेल्वे उड्डाणपूल, शिरूर तालुक्यात रिलायन्स गॅस ट्रान्सपोर्टेशन हब इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून झालेली पिकांची हानी, सिंहगडावरील स्टॉलधारकांचे पुनर्वसन, मांगडेवाडी, फुरसुंगी, शिवणे, न्यू अहिरे या भागातून जाणाऱ्या रिंगरोडबाबत स्थानिक शेतकऱ्यांच्या असलेल्या हरकती, अशा विविध प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाली.