पुरवठादारांनी ड्रग्ज तस्करीचा बदलला पॅटर्न; उपनगरांना केले लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 12:08 PM2024-08-10T12:08:07+5:302024-08-10T12:09:24+5:30

महामार्गानजीक असणाऱ्या ठिकाणांना विशेष प्राधान्य

Suppliers have changed the pattern of drug trafficking Suburbs are targeted | पुरवठादारांनी ड्रग्ज तस्करीचा बदलला पॅटर्न; उपनगरांना केले लक्ष्य

पुरवठादारांनी ड्रग्ज तस्करीचा बदलला पॅटर्न; उपनगरांना केले लक्ष्य

दुर्गेश मोरे

पुणे : ललित पाटील प्रकरणामुळे पुण्यातील ड्रग्ज तस्करीचे कारनामे समोर आले. इतकच नाही तर रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. पोलिसांनीदेखील याकडे गांभीर्याने पाहिल्याने ड्रग्ज पुरवठादारांनी आता आपल्या ठिकाणांसह तस्करीचा पॅटर्नही बदलून टाकला आहे. तस्करीसाठी आता महिला, मुलींचा वापर करण्यास सुरुवात केली आहे, तर पुरवठादारांनी उपनगरासंह शहराच्या हद्दीनजीक असणाऱ्या गावांवर लक्ष्य केंद्रित केले असल्याचे नुकत्याच कात्रज येथे सापडलेल्या 21 लाखांच्या मेफेड्रोन घटनेवरून समोर आले आहे.

पुण्याची ओळख आता ड्रग्जचे शहर म्हणून झाली आहे. ललित पाटील प्रकरणानंतर पबमध्ये घडत असलेल्या घडामोडींमुळे, तर ड्रग्ज तस्करीचे किती मोठे रॅकेट असेल याची प्रचिती येते. ३० सप्टेंबर २०२३ रोजी ससून रुग्णालयाच्या गेटजवळ तब्बल दोन कोटी रुपयांचे मॅफेड्रॉन हे ड्रग्ज आढळून आले होते आणि इथपासूनच ड्रग्जचे पुणे कनेक्शन उघड होण्यास सुरुवात झाली. परंतु, अद्यापही त्याच्या मुळापर्यंत पोहोचणे पोलिसांना शक्य झाले नाही. शहरातील पबमध्ये ड्रग्जचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांचे लक्ष आता शहरातील हालचालींवर केंद्रित झाले आहे. पोलिसांनी ड्रग्ज तस्करीच्या संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या मुसक्या आवळल्या आहेत, तर पबसाठी कडक नियमावली तयार केली असून, गेल्या काही दिवसांपासून शहरातील पब बंद आहेत.

ड्रग्जचा पुरवठा आणि तस्करी काेरेगाव पार्क, कल्याणीनगर त्याचबरोबर खराडीसारख्या उच्चभ्रू भागात होत असल्याने पोलिसांनी या भागावरच सर्वाधिक लक्ष्य केंद्रित केले आहे. यामुळे पुरवठादारांनी उच्चभ्रू भागातील आपली ठिकाणे बंद करून आपला मोर्चा शहराच्या उपनगरांकडे वळवला आहे. विशेष करून त्या ठिकाणावरून महामार्ग जवळच असेल अशी ठिकाणी निवडली असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. पुरवठादारांनी केवळ आपली ठिकाणेच बदलली नाही तर तस्करीचा पॅटर्नदेखील बदलला आहे. पूर्वी तरुणांकडून ड्रग्जची तस्करी व्हायची आता मात्र, यामध्ये बदल करून तरुणींकडून तस्करी करवून घेतली जात असल्याचे सूत्रांची माहिती आहे.

उपनगरांचे यामुळे वाढले महत्त्व

कामानिमित्त बाहेरच्या जिल्ह्यातून पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या लोकांचे वास्तव्य नऱ्हे, कात्रज, हडपसर, वाघोली, बाणेरसारख्या ठिकाणी अधिक आहे. या ठिकाणांपासून महामार्ग अगदी जवळ किंबहूना या ठिकाणांवरूनच जात असल्याने पुरवठादारांना ही ठिकाणे ड्रग्ज तस्करीसाठी महत्त्वाची बनली आहे. विशेष म्हणजे इथे वास्तव्यास असणारी लोकंही कामानिमित्त आलेली असतात त्यामुळे विशेष असे लक्ष या ठिकाणी पोलिस प्रशासनाकडून दिले जात नाही. त्याचाच फायदा आता ड्रग्ज पुरवठादार उचलत आहेत. या भागामध्ये अनेक मोठमोठी गोडाऊन, बंगले आहेत. ही कधी रिकामी असतात, तर कधी तेथे हालचाली सुरू असल्याचे जाणवते. तर तस्करीसाठीही मनुष्यबळ लगेचच उपलब्ध होते. कोरोनाकाळानंतर मध्यमवर्गीयांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे.

कुटुंबातील तरुणांबरोबर तरूणीही कामाच्या शोधात असतातच अशा कामाची आवश्यकता असणाऱ्या तरुणींचा शोध घेऊन त्यांचा वापर शहराच्या इतर भागांत ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी केला जात आहे. तरुणी असल्यानेही साहजिकच कोणालाही शंका येत नाही. तसेच दुसरीकडे महामार्गाजवळ असल्याने पुण्यातून लगेच आपले बस्तान इतरत्र हलवणेदेखील सोपे आहे. हे कुंरकुंभ एमआयडीसीत तीनवेळा झालेल्या ड्रग्ज कारवाईवरून समोर आले आहे. आज महामार्गालगत तसेच टोलनाक्याच्या नजीक मोठमोठे कंटेनर थांबलेले असतात. त्यामध्ये काय असते याचा कोणीही शोध घेत नाही. किंवा इतका वेळा हा कंटेनर का थांबला आहे याचीही कोणी विचारपूसही करत नाहीत.

ललित पाटील प्रकरणाचा तपास संथगतीने

ललित पाटील प्रकरणामुळे पुण्यातील ड्रग्जचे रॅकेट उघडकीस आले; पण प्रकरणाचा तपास इतक्या संथगतीने झाला की ड्रग्ज धंद्यातील बड्या माशांना पळण्यास मुभा मिळाली, ठिकाण बदलण्यास वाव मिळाला अशी चर्चाही आता सुरू आहे. पोलिसांची गोपनीय यंत्रणा माहिती मिळविण्यास कमी पडली की काय? असा प्रश्नही यानिमित्ताने समोर येत आहे. ललित पाटीलसह १२ जणांना मोक्का कारवाई केली. तसेच त्याला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्यांवरही कारवाई केली; पण या  ड्रग्जची कोठे साठवणूक केली जात होती, पुरवठादार काेण होते तस्करी करणारे कोण होते या प्रश्नांची उत्तरे मात्र आजपर्यंत मिळाली गेली नाहीत.

एवढेच नाही तर ज्या हॉटेलमध्ये ललीत पाटील वास्तव्यास होता त्या ठिकाणची बिले कोणी भरली, ड्रग्ज तस्करीप्रकरणात कोणती वाहने वापरण्यात आली या  प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीतच आहेत. तसचे ससून रुग्णालयात ज्या ठिकाणी ललित पाटील होता त्या ठिकाणी असणारे सीसीटीव्ही वळवले होते ते कोणी वळवले, ते दाेषी कोण आहेत त्या ठिकाणी खासगी सुरक्षा सक्षक हाेते त्यांच्या चौकशीतून कोणत्या गोष्टी समोर आल्या हेही अजून गुलदस्त्यातच आहे. सध्या नार्कोटेक्स विभागाकडे तपास असला तरी त्यांच्या हातात काय सापडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

लघुउद्योगांकडे लक्ष्य द्यायला कोणालाच नाही वेळ

महामार्गालगत असलेल्या उपनगरांसह पुण्याच्या नजीक असणाऱ्या कुरकुंभ, मुळशी, खेड-शिवापूर, रांजणगाव गणपती, चाकणसारख्या औद्योगिक महामंडळांमध्ये (एमआयडीसी) अनेक लघुउद्योग सुरू आहेत. महामंडळ वीज आणि पाणी देते. त्यानंतर हे लघुउद्योग सुरू झाले आहे की नाही, कोणत्या प्रकारचे उत्पादन घेत आहे तसेच सक्षम सुरक्षायंत्रणा आहे की नाही बाधंकाम पूर्ण झाले की नाही याची अपवाद वगळता कधीही पाहणी केली जात नाही. कुरकुंभ एमआयडीसीमध्ये आतापर्यंत ड्रग्ज संदर्भात तीन कंपन्यांवर कारवाई झाल्या आहेत.

या कंपन्या काही मोठ्या नाही तर लघु उद्योगच होते. औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचलनालय विभागाकडून जोपर्यंत प्रमाणपत्र दिले जात नाही तोपर्यंत लघु उद्याेगांना उत्पादन सुरू करता येत नाही. ड्रग्ज प्रकरणांमध्ये कुरकुंभ एमआयडीसीतील समर्थ लॅबोरेटरी, सुजलाम केमिकल आणि अर्थकेम कंपन्यांवर कारवाई करण्यात आली त्यांना या विभागाची परवानगीच मिळाली नसल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता ड्रग्जसाठी या कंपन्याचा वापर केला जात असल्याचे समोर येऊन सुद्धा लघुउद्योगांकडे एमआयडीसी प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही किंवा पोलिस प्रशासनाचेहीदेखील याकडे लक्ष्य जात नाही.

Web Title: Suppliers have changed the pattern of drug trafficking Suburbs are targeted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.