भाजपाला हरवू शकणाऱ्या उमेदवाराला पाठींबा ; आपची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 03:40 PM2019-04-12T15:40:31+5:302019-04-12T15:42:25+5:30
भारतीय जनता पक्ष हा पहीला शत्रू असून राष्ट्रहितासाठी जाे उमेदवार भाजपाच्या उमेदवाराला हरवू शकेल त्याला पाठींबा देणार असल्याची भूमिका आपकडून घेण्यात आली आहे.
पुणे : भारतीय जनता पक्ष हा पहीला शत्रू असून राष्ट्रहितासाठी जाे उमेदवार भाजपाच्या उमेदवाराला हरवू शकेल त्याला पाठींबा देणार असल्याची भूमिका आपकडून घेण्यात आली आहे. आपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निवृत्त ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी ही माहिती पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आपचे शहराध्यक्ष मुकुंद किर्दत उपस्थित हाेते. पुण्यात काॅंग्रेेसचे उमेदवार माेहन जाेशी यांना आपकडून पाठींबा देण्यात येणार आहे.
आम आदमी पार्टी महाराष्ट्रात निवडणूक लढवत नसली तरी भाजपाला हरवू शकणाऱ्या उमेदवाराला आपकडून पाठींबा देण्यात येणार आहे. हा पाठींबा कुठल्याही पक्षाला नसून केवळ उमेदवाराला असणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता हा निर्णय घेण्यात आला असून विधानसभेला तेव्हाच्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल असेही सावंत यांनी यावेळी सांगितले. तसेच आपची लढाई ही भ्रष्टाचाराविरुद्धची आहे. परंतु सध्या भाजप हा सर्वात माेठा शत्रू आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहून आम्ही भाजपाला हरवू शकणाऱ्या उमेदवाराला पाठींबा देण्याची भूमिका घेतली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल येणार नसून ही केवळ अफवा असल्याचेही त्यांन सांगितले.
सावंत म्हणाले, राजकीय भूमिका ही परिस्थितीनुसार घ्यावी लागते. राष्ट्राच्या हिताची भूमिका घेणे हे प्रत्येक पक्षाचे कर्तव्य आहे. 2014 ला माेदी सत्तेत आल्यानंतर देशातील स्वायत्त संस्थांना उखडून टाकण्याचं काम माेदींनी केलं आहे. सर्वाेच्च न्यायालयावर हल्ला केला, सीबीआय नष्ट करुन टाकली. आरबीआयवर हल्ला केला. आरबीआयमधून बेकायदेशीर पैसे काढले आहेत. सैन्याचे दमण केले आहे. सैनिक सैन्यातून बाहेर आल्यावर त्यांना नाेकरी दिली जात नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. हे सरकार पुन्हा सत्तेत आलं तर या देशातील लाेकशाही नष्ट हाेऊन हुकुमशाही येईल. त्यामुळे भाजप हा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे तर काॅंग्रेस हा दुसऱ्या क्रमांकाचा शत्रू आहे. राष्ट्राच्या हितासाठी पक्षाचे हित आम्ही पाहिलं नाही. जाे पक्ष आणि उमेदवार भाजपाला हरवेल त्याला पाठींबा देण्याची भूमिका आम्ही घेतली आहे.