Maratha Reservation: मुस्लिम, वंचित बहुजन आघाडीकडून मराठा आरक्षणाला पाठिंबा
By श्रीकिशन काळे | Published: October 31, 2023 03:57 PM2023-10-31T15:57:58+5:302023-10-31T15:58:23+5:30
आमदार आणि खासदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन व्हायला हवे. तोपर्यंत हे सरकार त्याची दखल घेणार नाही - प्रकाश आंबेडकर
पुणे : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पुण्यातील मुस्लिम समाजानेही पाठिंबा दिला आहे. त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी कोंढव्यामध्ये आज सकाळपासून लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले आहे. कोंढव्यातील ज्योती चौकात हे उपोषण सुरू आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीने देखील पाठिंबा दर्शविला आहे. तसे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहे.
सध्या राज्यभरातून मुस्लिम समाजातील नागरिक या उपोषणाला पाठिंबा देत आहेत. मराठा समाजातील गरीबांना या आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील उपोषण करत आहेत. त्यांनी राज्यातील सर्वांना आवाहन केले आहे की, गावागावामध्ये साखळी उपोषण करून आरक्षणाची मागणी करा. त्याला साद देत कोंढव्यातील मुस्लिम फांउडेशन, छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम मावळा आणि माजी नगरसेवक ॲड. हाजी गफूर पठाण यांनी उपोषणाला पाठिंबा देत लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी पत्र लिहून जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला आहे. मराठा आरक्षण हा विषय राज्य व केंद्र सरकारच्या अखात्यारित्यचा आहे. त्यामुळे आमदार आणि खासदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन व्हायला हवे. तोपर्यंत हे सरकार त्याची दखल घेणार नाही, असेही आंबेडकरांनी पत्रात नमूद केले आहे.