कोरोनामुळे अनाथ झालेल्या चार बालकांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:11 AM2021-05-25T04:11:15+5:302021-05-25T04:11:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना महामारीत दोन्ही पालक गमावलेल्या जिल्ह्यातील चार बालकांना जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने महिला व बाल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना महामारीत दोन्ही पालक गमावलेल्या जिल्ह्यातील चार बालकांना जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने महिला व बाल विभागाच्या बालगृहात दाखल करण्यात आले आहे. कोरोना महामारीने दोन्ही पालक गमावलेल्या किंवा ज्या मुलांचे दोन्ही पालक कोरोना उपचारासाठी दाखल आहेत, अशा बालकांची माहिती आरोग्य यंत्रणेने तातडीने सादर करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली आहे.
कोरोनामुळे दगावलेल्या पालकांच्या ४ बालकांची देखभाल व संरक्षण बाल कल्याण समितीच्या आदेशाने काळजी आणि संरक्षणासाठी महिला व बाल विभागाच्या बालगृहात दाखल करण्यात आले असून या बालकांचे जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत संगोपन करण्यात येत असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
चौकट
बाल संरक्षक कृती दलामार्फत काम
कोरोना प्रादुर्भावात बालकांची काळजी आणि संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना, तसेच कोविड-१९मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे हक्क मिळवून देत त्यांच्या संगोपनासाठी उपाययोजना व्हाव्यात, यासाठी राज्यात जिल्हास्तरीय बाल संरक्षक कृती दल गठीत करण्यात आले आहे. कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टीने त्यांचे न्याय-हक्क मिळवून देऊन त्यांच्या संगोपनासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे काम या कृती दलाच्या माध्यमातून होत आहे.
चौकट
या हेल्पलाईनवर संपर्क साधा
कोविड-१९ मुळे पीडित संगोपनाचा प्रश्न निर्माण झालेल्या बालकांची माहिती जिल्हा प्रशासनास मिळण्यासाठी जिल्हास्तरावर बालकांसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये चाईल्ड हेल्पलाईन १०९८ ही चोवीस तास सुरू असून, ८३०८९९२२२२ किंवा ७४०००१५५१८ या मोबाईल क्रमांकावर सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत संपर्क साधता येणार आहे. या हेल्पलाईनबाबतची माहिती सर्व रुग्णालय आणि सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.