एचआयव्हीग्रस्तांना आधाराची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:28 AM2018-08-29T00:28:35+5:302018-08-29T00:29:03+5:30
सनी लोपेज : वर्षासहलीचे आयोजन करून दिला ११० बालकांना आनंद
चाकण : निसर्गरम्य सहलीचा आनंद एकट्याने उपभोगण्यापेक्षा एचआयव्हीग्रस्त बाळगोपाळांबरोबर लुटला, तर तो द्विगुणित होतो. या बाळगोपाळांच्या आनंदात व आयुमार्नात वाढ होण्यासाठी अशा मानसिक आधार देणाऱ्या उपक्रमांची अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन महिंद्रा कंपनीच्या अधिकारी सनी लोपेज यांनी केले.
महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लि. व यश फाउंडेशन, चाकण (ता. खेड) यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा येथे एचआयव्हीग्रस्त बालक व त्यांच्या परिवारासाठी वर्षासहलीचे आयोजन केले होते. यावेळी त्या बोलत होत्या. सहल चाकण ते लोणावळा (एकवीरादेवी) या ठिकाणी काढण्यात आली होती. सहलीमध्ये लोणावळ्याच्या निसर्गरम्य वातावरणाचा बाळ-गोपाळांनी मनमुराद आनंद लुटला. या सहलीमध्ये ११० एचआयव्हीग्रस्त बालक व पालकांनी सहभाग नोंदविला. या प्रसंगी पालकांनी अशा उपक्रमांमुळे आमच्या मुलांना जीवनातील आनंदी क्षण एकमेकांबरोबर वाटून, इतर मुलांप्रमाणेच मनमोकळे जगता येत आहे, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी महिंद्रा कंपनीचे सनी लोपेज व यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील, यश फाउंडेशनचे कर्मचारी उपस्थित होते.