रद्दी संकलनातून मिळतोय गरजूंना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 02:54 AM2018-08-29T02:54:52+5:302018-08-29T02:55:07+5:30
बीइंग वॉलिंटियर संस्थेचा पुढाकार : २५०० स्वयंसेवकाच्या मदतीने काम सुरू
अतुल चिंचली
पुणे : शिका आणि मोठे व्हा, शिक्षण घ्या प्रगती करा, अशा वाक्यांचा खरा अर्थ आपल्याला शिक्षण घेतानाच समजू लागतो. समाजात अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गरजांसोबत शिक्षण ही महत्त्वाची गरज आहे. त्यासाठी समाजातील प्रत्येक मुलाने शिकायला पाहिजे. अशाच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना रद्दी संकलन केलेल्या पैशातून त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी बीइंग वॉलिंटियर संस्थेने पुढाकार घेतला आहे.
ही संस्था २०१४ पासून या कामात कार्यरत आहे. पूर्ण महाराष्ट्रातून २५०० स्वयंसेवकाच्या मदतीने काम करते. महाराष्ट्रात पानशेत, मुळशी, हिंजवडी, कर्जत अशा भागांतील आदिवासी विद्यार्थ्यांना मदत केली आहे. त्याचप्रमाणे वृक्षारोपण, अनेक निरनिराळे उपक्रम व कार्यशाळा अशा गोष्टी संस्थेच्या माध्यमातून केल्या जातात. रद्दी संकलन करण्यासाठी संस्थेने पुणे शहरातील अनेक सोसायट्या व कंपन्याची मदत घेतली आहे. पिंपळे गुरव, औंध, हडपसर, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, आनंदनगर या भागांतील या सोसायटीकडून रद्दी संकलन केले आहे. त्यामध्ये डॅफोडिल्स सोसायटी पिंपळे गुरव, हर्ष पॅराडाईज औंध, वात्सल्य विहार औंध, सारा सोसायटी बाणेर, क्रीमसन बाणेर, टकराऊ सोसायटी, तर टीसीएस, एनविडिया, सिमेंटेक या कंपन्यांकडून रद्दी घेतली जाते. दर महिन्याला २००० किलो रद्दी गोळा होते. ही रद्दी पुन्हा रिसायकलिंग करण्यासाठी मोठ्या एजन्सीला दिली जाते. मागील वर्षी संस्थेने वर्षभरात २०८०० किलो रद्दी गोळा केली. यातून संस्थेला १७१२५४ एवढे पैसे मिळाले. या पैशाचा वापर पानशेत भागातील रचना हॉस्टेलमध्ये शिकत असणाऱ्या आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी करण्यात आला. सोसायटीमध्ये रद्दी गोळा केली की, त्या मुलांसाठी कागदापासून पेपर बॅग, डस्टबिन बॅग, अशा वस्तू कशा प्रकारे बनवल्या जातात, याची कार्यशाळा घेतली जाते.
रद्दी संकलन या उपक्रमाला आम्ही २०१५ साली सुरुवात केली. शिक्षण ही एक गरज असल्याने ती पूर्ण करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. समाजात सर्वांना शिक्षणाचा हक्क आहे. आपल्या महाराष्ट्रातील अनेक भागांत आदिवासी लोक मोठ्या प्रमाणावर राहतात. पण काही आर्थिक अडचणींमुळे ते शैक्षणिक खर्च उचलू शकत नाही. आमची संस्था अशाच गरजू विद्यार्थ्यांसाठी पुढाकार घेऊन त्यांना आधार देते.
- कैलास नरावडे, अध्यक्ष, बीइंग वॉलिंटियर संस्था