महाराष्ट्र संपाला परिचारिकांचा पाठिंबा; शुक्रवारी सकाळी १ तास बॅक आऊट
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: February 15, 2024 05:19 PM2024-02-15T17:19:55+5:302024-02-15T17:20:27+5:30
केंद्र शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात कामगार आणि कर्मचा-यासाठी कोणतीही तरतूद किंवा सवलत नाही
पुणे : महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन ही राज्य सरकारी कर्मचारी संघटना यांची घटक संघटना असल्याने महाराष्ट्राच्या संपामध्ये सामील होत आहे. या आंदोलनामुळे राज्य शासन, स्थानिक प्रशासनाचे प्रलंवित प्रश्नांकडे लक्षवेध करण्याचा उद्देश आहे. त्यानुसार दि.१६ रोजी सकाळी ७.३० ते ८.३० दरम्यान १ तास बॅक आऊट करून शासनाविरोधात निदर्शन करणार असल्याची माहीती महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा रेखा थिटे व उपाध्यक्षा सुरेखा शेलार यांनी पत्रकाद्वारे दिली.
केंद्र शासनाने सादर केलेल्या अर्थसंकल्पात कामगार आणि कर्मचा-यासाठी कोणतीही तरतूद किंवा सवलत नाही. खाजगीकरण, कंत्राटीकरण धोरणाशी संबंधित असलेला कायदा रद्द व्हावा, नवीन शैक्षणिक धोरण्याचा पुनर्विचार करण्यात यावा, कंत्राटी कामगार कर्मचा-यांची सेवा नियमित करावी याबाबत सर्वस्वी मौन बाळगण्यात आले आहे. तसेच जीवघेणी भाववाढ रोखण्यासाठी कोणतीही ठोस उपाय योजना करण्यात येत नाही, असे या पत्रकात म्हटले आहे.
त्याचप्रमाणे स्थानिक युनिफॉर्म भत्ता, वॉशिंग भत्ता, मेसिंग भत्ता, विशेष सेवाभत्ता (ओटी भत्ता), अनुज्ञाप्ती शुल्क वेतनामध्ये मिळत नाहीत ते त्वरीत मिळावेत या सर्व प्रश्नांबाबत कर्मचा-यांमध्ये कमालीची संतप्त नाराजी आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन ही राज्य सरकारी कर्मचारी संघटना यांची घटक संघटना असल्याने या संपामध्ये सामील होत आहे. या आंदोलनामुळे राज्य शासन, स्थानिक प्रशासनाचे प्रलंवित प्रश्नांकडे लक्षवेध करण्याचा उद्देश आहे, असे सरचिटणीस माधुरी ओंबाळे यांनी स्पष्ट केले.