पोलीसकाकांमुळे विद्यार्थ्यांना आधार, पोलीस आयुक्तांचा अभिनव उपक्रम, संकटकाळी खाकी वर्दीतल्या मित्राकडून मार्गदर्शन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 03:44 AM2017-09-16T03:44:43+5:302017-09-16T03:45:04+5:30

पालक मुलांना शाळेमध्ये सोडून खरोखरीच ‘निर्धास्त’ होतात का? मुलं घरी येईपर्यंत आई-वडिलांच्या मनात कायमच एक भीती दडलेली असते. त्यांच्यासोबत गैरप्रकार घडू नयेत, त्यांनी मोकळेपणाने बोलावे आणि पालकांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, याकरिता पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या संकल्पनेमधून

 Support for the students due to the police force, the police commissioner's innovative initiative, guidance from a friend of the emergency khaki | पोलीसकाकांमुळे विद्यार्थ्यांना आधार, पोलीस आयुक्तांचा अभिनव उपक्रम, संकटकाळी खाकी वर्दीतल्या मित्राकडून मार्गदर्शन  

पोलीसकाकांमुळे विद्यार्थ्यांना आधार, पोलीस आयुक्तांचा अभिनव उपक्रम, संकटकाळी खाकी वर्दीतल्या मित्राकडून मार्गदर्शन  

Next

पुणे : पालक मुलांना शाळेमध्ये सोडून खरोखरीच ‘निर्धास्त’ होतात का? मुलं घरी येईपर्यंत आई-वडिलांच्या मनात कायमच एक भीती दडलेली असते. यासोबतच मुलंही अनेक प्रकारच्या दडपणाखाली असतात. त्यांच्यासोबत गैरप्रकार घडू नयेत, त्यांनी मोकळेपणाने बोलावे आणि पालकांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, याकरिता पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या संकल्पनेमधून सुरू करण्यात आलेल्या ‘पोलीसकाका’ या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा उपक्रम सुरू झाल्यापासून शंभरच्यावर आलेल्या तक्रारींची पोलीसकाकांनी दखल घेतली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एक हजारांच्यावर शाळा आणि महाविद्यालये आहेत. जवळपास दहा लाख विद्यार्थी या दोन शहरांमध्ये शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्यांना तत्काळ मदत व आवश्यकता भासल्यास मार्गदर्शन देण्यासाठी पोलीसकाका ही संकल्पना राबविण्यासंदर्भात आयुक्त शुक्ला यांनी संकल्पना मांडली होती. सध्या शाळांमध्ये शिक्षकांकडून तसेच स्कूल व्हॅनचालकांकडून लैंगिक शोषणाचे प्रकार वाढत चालले आहेत. यासोबतच मुलांच्या सुरक्षेचा मुद्दाही दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अनेकदा मुलांना शाळेमध्ये होणारी मारहाण, शाब्दिक शोषण समोर येत नाही. मुले दडपणाखाली आणि घाबरलेल्या अवस्थेत बोलायला तयार होत नाहीत. शाळेत जायला घाबरतात. यासोबतच महाविद्यालयीन तरुणींना छेडछाड, एक टक पाहणे, अश्लील शेरेबाजी करणे, रस्ता अडवणे, रॅगिंग आदी समस्यांचा सामना करावा लागतो. यासोबतच तरुणांनाही गटातटाची भांडणे, मुद्दाम त्रास देण्याचेही प्रकार घडतात. अशा वेळी महाविद्यालय अथवा शाळा स्तरावर तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. उलट पीडित मुलांना आणि त्यांच्या पालकांना संस्थेची इभ्रत जाईल, म्हणून शांत बसायला सांगितले जाते. पालकांवर त्यासाठी दबाव टाकला जातो. अनेक शाळांमध्ये मुलांसाठी वेगळी स्वच्छतागृहे नाहीत. स्वच्छतागृहांच्या बाहेर, क्लासरूममध्ये, शाळांच्या छतांवर, आवारात आणि अडगळीच्या ठिकाणीही सीसीटीव्ही कॅमेरे असायला हवेत. विद्यार्थ्यांना मोकळेपणाने बोलता यावे, त्यांना समस्या मांडता याव्यात, याकरिता पोलीसच त्यांचे मित्र होतील. या खाकी वर्दीतल्या मित्रांशी त्यांचे नाते तयार होईल आणि भीतीचा कोष फोडून मुले खुलेपणाने तक्रारी करतील यासाठी पोलीसकाका उपक्रम सुरू करण्यात आला. संबंधित शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांना संपर्क साधल्यास ते तत्काळ कायदेशीर मदत देत आहेत. छेडछाड, दादागिरी, रॅगिंंग, अमली पदार्थांची विक्री, सायबर क्राईम याबाबत मार्गदर्शन लागल्यास पोलीसकाकांना संपर्क करण्यात येत आहे. यामुळे पोलीस आणि विद्यार्थ्यांमधील सुसंवाद वाढीस लागला असून पुढे येऊन न घाबरता विद्यार्थी तक्रारीही करू लागले आहेत. शाळा आणि महाविद्यालयांसाठी प्रत्येकी एका पोलीस कर्मचाºयाची नेमणूक करण्यात आलेली आहे. या पोलीसकाकाचे नाव व मोबाईल क्रमांक शाळेच्या, महाविद्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आले होते. कार्यक्रमांचे आयोजन करून मुलांना पोलीसकाकांशी कशा प्रकारे संपर्क साधायचा, याबाबत मार्गदर्शनही करण्यात आलेले आहे. या उपक्रमासाठी शाळा, महाविद्यालयातील एक शिक्षक समन्वयक म्हणून काम पाहत आहे, तर पोलीस ठाणेस्तरावर सहायक निरीक्षक दर्जाचा एक अधिकारी समन्वयक म्हणून काम करीत आहे. सर्व पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांना या शाळा, महाविद्यालयांमध्ये भेट देऊन माहिती देण्याच्याही सूचना शुक्ला यांनी केल्या होत्या. त्यानुसार, शाळांमधून शिक्षक, विद्यार्थी यांच्याशी संपर्क साधून ही योजना प्रभावीपणे राबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीसकाकांनी त्यांच्याकडे आलेल्या शंभरपेक्षा अधिक तक्रारींचे निवारण केले आहे. विशेषत: छेडछाड, अश्लील शेरेबाजी आणि एकटक पाहणे अशा तक्रारींचे प्रमाण अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रसंग क्र. १
स्थळ : डेक्कन परिसरातील एक महाविद्यालय
एक तरुणी डेक्कन परिसरातील एका महाविद्यालयामध्ये शिकते. दररोज महाविद्यालयात जाताना एक तरुण तिचा पाठलाग करायचा. तो काहीतरी करेल, या भीतीने ती तक्रार करायला घाबरत होती. तिला एका मैत्रिणीकडून पोलीसकाकांबद्दल माहिती मिळाली. त्यानुसार, तिने पोलीसकाकांशी संपर्क साधला. काही वेळातच पोलीसकाका महाविद्यालयाच्या जवळ पोहोचले. त्यांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यामध्ये नेऊन त्याची चौकशी करण्यात आली. संबंधित तरुणीने त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करायची नाही, असे सांगितल्याने तरुणाला समज देऊन सोडण्यात आले.

प्रसंग क्र. २
स्थळ : बाणेर- बालेवाडी

इंदौर येथे राहणारी १९ वर्षीय तरुणी पुण्यामध्ये एका संस्थेत संगणक शिक्षण घेण्यासाठी आलेली होती. सोबत शिकणाºया एका तरुणीच्या घरी ती पेर्इंग गेस्ट म्हणून राहत होती. एके दिवशी तिच्या मैत्रिणीचे काही साहित्य चोरीला गेले. याबाबत त्या मैत्रिणीने या तरुणीकडे चौकशी केली. तिने आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगितले. दरम्यान, तिच्या मैत्रिणीने वडिलांना चोरीबाबत सांगितले. तेव्हा तिच्या वडिलांनी इंदौरच्या तरुणीला दरडावून विचारायला सुरुवात केली. तिला दम भरल्यामुळे घाबरलेल्या तरुणीला काय करावे सुचत नव्हते. ती शिकत असलेल्या संस्थेमध्ये चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दयानंद ढोमे यांनी पोलीसकाकांविषयी स्वत: जाऊन माहिती दिलेली होती. त्यामुळे या तरुणीने पोलीसकाकांशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. निरीक्षक ढोमे यांनी तत्काळ पीडित मुलीसह तिची मैत्रीण आणि वडिलांना बोलावून घेतले. त्यांची समजूत घातली. शेवटी हे प्रकरण सामोपचाराने मिटले. काकांनी वेळीच दिलेल्या प्रतिसादामुळे या मुलीला दिलासा मिळाला.

Web Title:  Support for the students due to the police force, the police commissioner's innovative initiative, guidance from a friend of the emergency khaki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.