ST Strike: विलीनीकरणाचा लढा दाबून दाखवा; गुणरत्न सदावर्ते यांचे बारामतीतूनचं पवारांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 15:23 IST2021-12-19T15:23:00+5:302021-12-19T15:23:23+5:30
बारामती येथील एमआयडीसी आगाराजवळ मागील ४५ दिवसांपासून एसटी कामगारांचे शासकिय सेवेमध्ये विलीनीकरणाचासाठी दुखवटा आंदोलन सुरू आहे.

ST Strike: विलीनीकरणाचा लढा दाबून दाखवा; गुणरत्न सदावर्ते यांचे बारामतीतूनचं पवारांना आव्हान
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कामगारांचा शासकिय सेवेतील विलीनीकरणाचा लढा दाबून दाखवावा, असे आव्हान गुणरत्न सदावर्ते यांनी बारामती येथे रविवारी एसटी कामगारांसमोर बोलताना दिले. तसेच तुमच्यासाठी हा संप असला तरी आमच्यासाठी दुखवटा आहे, असेही यावेळी ते म्हणाले.
बारामती येथील एमआयडीसी आगाराजवळ मागील ४५ दिवसांपासून एसटी कामगारांचे शासकिय सेवेमध्ये विलीनीकरणाचासाठी दुखवटा आंदोलन सुरू आहे. एसटी कामगारांच्या या दुखवटा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुणरत्न सदावर्ते यांनी बारामतीमध्ये हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते.
सदावर्ते पुढे म्हणाले, शरद पवारांनी साखर सम्राट घडवले. त्यांचे ते अराध्य दैवत झाले मात्र त्यांना कामरागांचे कैवारी होता आले नाही. पवारांनी लोकांची दिशाभूल करून पावसात मतांचा जोगवा मागितला. उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब म्हणतात कामगारांनी आंदोलन ताणू नये. मात्र ज्याचं जळत त्यालाच कळतं. मात्र तुम्ही आमचा विलनीकरणाचा लढा दाबू शकत नाही. आम्हाला निलंबनाची, सेवासमाप्तीची भीती वाटत नाही, असेही यावेळी सदावर्ते म्हणाले. यावेळी जयश्री पाटील, दशरथ राऊत, काळूराम चौधरी आदी उपस्थित होते.
राज्य शासाकडून उद्या चर्चेचे आमंत्रण
''बारामती येथे बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य शासनावतीने शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई यांच्याकडून आम्हाला चर्चेसाठी आमंत्रण आले आहे. देसाई यांनी संविधानीक बाबींवर चर्चा करण्यासाठी उद्या सकाळी ९ वाजता बोलवले असल्याची माहिती यावेळी सदावर्ते यांनी दिली.''