Pune: गणेशखिंड रस्त्यावरील वृक्षतोडीला तूर्त सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 01:42 PM2023-12-16T13:42:30+5:302023-12-16T13:43:11+5:30
याची पुढील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे....
पुणे : गणेशखिंड रस्त्याच्या रुंदीकरणासाठी महापालिकेकडून करण्यात येत असलेल्या वृक्षतोडीला सर्वोच्च न्यायालयाने सात दिवसांसाठी स्थगिती दिली आहे. याची पुढील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे.
गणेशखिंड रस्त्याच्या रुंदीकरणासाठी करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीविरोधात ‘परिसर’ संस्थेच्या वतीने अमित सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने यापुढील वृक्षतोड तातडीने थांबवावी, महापालिकेने वृक्षतोडी संदर्भातील जाहीर नोटीस पुन्हा प्रसिद्ध करावी. हरकती मागवून त्यावर पुन्हा सुनावणी घ्यावी, असे न्यायालयाने म्हटले होते.
महापालिका नव्याने हरकती मागवून प्रक्रिया पार पाडून वृक्षतोड करेल, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाकडे (एनजीटी) धाव घेतली. मात्र, ‘एनजीटी’ने अंतरिम संरक्षण देण्यास नकार देऊन जानेवारी २०२४ मध्ये सुनावणी ठेवली. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
सर्वोच्च न्यायालयाने दि. १५ डिसेंबरला दुपारी ३ वाजतापासून २१ डिसेंबरपर्यंत वृक्षतोडीला मनाई केली. तसेच, हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात चालविण्याची सूचना केली. त्यानुसार पुढील आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होऊन अंतिम निकाल दिला जाणार आहे.