सुप्रिया किंद्रे राज्यातील श्वान प्रशिक्षक पहिल्या महिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:10 AM2021-07-01T04:10:19+5:302021-07-01T04:10:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस दलासाठी काम करणाऱ्या श्वानांचा सांभाळ करणे हे अतिशय कठीण काम समजले जाते. पोलीस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पोलीस दलासाठी काम करणाऱ्या श्वानांचा सांभाळ करणे हे अतिशय कठीण काम समजले जाते. पोलीस श्वानांना दिले जाणारे प्रशिक्षणही अन्य श्वानांपेक्षा खडतर असते. अशा परिस्थितीत श्वान प्रशिक्षण अभ्यासक्रम परीक्षेत राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) श्वान प्रशिक्षक सुप्रिया किंद्रे-धुमाळ यांनी देशात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
सुप्रिया किंद्रे यांनी मध्य प्रदेशातील टेकनपूर येथील नॅशनल ट्रेनिंग सेंटर फॉर डॉग (एनडीसीडी) या संस्थेतून श्वान प्रशिक्षक अभ्यासक्रम पूर्ण केला. देशभरातील विविध राज्यातील पोलीस तसेच निमलष्करी दलातील श्वान प्रशिक्षक या अभ्यासक्रमात सहभागी झाले होते. या अभ्यासक्रमासाठी निवडल्या गेलेल्या सुप्रिया एकमेव महिला होत्या. महाराष्ट्र पोलीस दलातून त्यांना श्वान प्रशिक्षक अभ्यासक्रमास पाठविण्यात आले होते. या अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत महिलेची निवड झाली नव्हती.
श्वान हाताळणी (हँडलर) ते प्रशिक्षकपदापर्यंतचा प्रवास उलगडताना त्या म्हणाल्या की, देशपातळीवर पोलीस किंवा निमलष्करी दलातील श्वान केंद्रात (डॉग युनिट) महिला प्रशिक्षक नाहीत. महिला श्वान हँडलर आहेत. पण प्रशिक्षकपदापर्यंत पोहोचण्यासाठी अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.
पोलीस श्वानांचे प्रशिक्षण अवघड
पोलीस दलातील श्वानांना हाताळणाऱ्र्या महिलांची संख्या अत्यल्प आहे. महाराष्ट्रातील श्वानांना पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील श्वान प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षकांना श्वानांचा सांभाळ करण्याची आवड असणेही महत्त्वाचे आहे. माझ्या वडिलांनी मला श्वानांचा लळा लावला. अगदी लहान वयापासून मी श्वानांचा सांभाळ करायचे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील बोगवली हे माझे गाव आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला मार्गदर्शन केल्याने मी श्वान प्रशिक्षक अभ्यासक्रमात यश मिळवू शकले.
- सुप्रिया किंद्रे
.....
सुप्रिया किंद्रे यांनी श्वान प्रशिक्षण अभ्यासक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केला. कोरोनाच्या संसर्गात टेकनपूर येथील श्वान प्रशिक्षण संस्थेतून त्यांनी निवासी अभ्यासक्रम पूर्ण केला. अशा प्रकारचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या महिला श्वान प्रशिक्षक ठरल्या आहेत.
- अतुलचंद्र कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस महासंचालक, सीआयडी
फोटो- सुप्रिया किंद्रे