Ashadhi Wari: जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग..! संतांच्या विचारांचा वारसा महिलांच्या दिंडीतून पुढे...

By प्रमोद सरवळे | Published: June 30, 2024 01:35 PM2024-06-30T13:35:58+5:302024-06-30T13:39:10+5:30

पालखी सोहळ्यात महिलांनाही हक्काने वीणा हातात घेता यावा, त्यांनाही पुरुष कीर्तनकाराच्या बरोबरीने कीर्तन करता यावे यासाठी सुप्रियाताई साठे प्रयत्नशील

Supriya Sathe carried forward the legacy of women kirtankaras like men | Ashadhi Wari: जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग..! संतांच्या विचारांचा वारसा महिलांच्या दिंडीतून पुढे...

Ashadhi Wari: जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग..! संतांच्या विचारांचा वारसा महिलांच्या दिंडीतून पुढे...

एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी।

माझा ज्ञानराज गोपाळाशीं लाह्या वाटीं ॥१॥
नामदेव कीर्तन करी पुढें नाचे पांडुरंग ।

जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग ॥२॥
अभंग बोलतां रंग कीर्तनीं भरिला ।

प्रेमाचेनि छंदें विठ्ठल नाचू लागला ॥३॥
नाचतां नाचतां देवाचा गळाला पितांबर ।

सावध होई देवा ऐसा बोले कबीर ॥४॥
साधू या संतांनीं देवाला धरिला मनगटीं ।

काय झालें म्हणूनी दचकले जगजेठी ॥५॥
ऐसा कीर्तन महिमा सर्वांमाजीं वरिष्ठ ।

जडमूढ भाविका सोपी केली पायवाट ॥६॥
नामयाची जनी लोळे संताच्या पायीं ।

कीर्तन प्रेमरस अखंड देईगे विठाई ॥७॥

पुणे : संतांची समतेची शिकवण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न अनेक वारकरी निष्ठेने करीत आहेत. त्यापैकी एक प्रमुख नाव म्हणजे कीर्तनकार हभप सुप्रियाताई साठे ठाकूर. पालखी सोहळ्यात महिलांनाही हक्काने वीणा हातात घेता यावा, त्यांनाही पुरुष कीर्तनकाराच्या बरोबरीने कीर्तन करता यावे यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. संतांच्या विचारांचा वारसा समृद्धपणे पुढे नेण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत.

सुप्रियाताई यांच्या घरात गेल्या चार पिढ्यांपासून वारीची परंपरा आहे. आईच्या पोटात असतानाच वारी सुरू झाली, असे त्या सांगतात. वयाच्या सातव्या वर्षी पहिल्यांदा त्या आजोबांबरोबर वारीमध्ये चालल्या. लहानपणापासून कीर्तनाची गोडी लागली.

पालखी सोहळ्यात महिलांना विशेष स्थान असलेली दिंडी असावी. जिथे टाळकरी, वीणेकरी, गायक महिला असतील आणि पताकाही महिलांच्या हातात असल्या पाहिजेत, असे वाटत होते. त्यानिमित्ताने सुप्रियाताईंनी संत तुकाराम महाराजांच्या जन्म चतु:शताब्दीनिमित्त २००८ मध्ये श्री संत जिजाबाई महिला प्रासादिक दिंडीची स्थापना केली.

पाचशे जणांची ही दिंडी देहू ते पंढरपूर अशी पायी वारी करते. यामध्ये प्रामुख्याने महिला वारकरी असतात. संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाच्या पाठीमागे १९१ क्रमांकाची ही दिंडी आहे. सुप्रियाताई कीर्तनकार असल्याने सध्या त्यांच्या आई विजयाताई साठे दिंडीचालक म्हणून काम पाहतात.

वारीचा इतिहास पाहिला तर यापूर्वी वारीत महिला वीणेकरी नव्हत्या. तसा प्रयोगही कुणी केला नव्हता. पण या दिंडीत झेंडेकरी महिला, तुळशीवाल्या महिला, टाळकरी महिला, पखवाजवादक महिला असतात. सुरुवातीच्या मालिकेपासून ते शेवटच्या उपसंहाराच्या अभंगापर्यंत महिलाच सर्व जबाबदारी पार पाडतात. २०२३ मध्ये दुबईच्या काही महिलाही या दिंडीत सहभागी झाल्या होत्या.

इंदापूरच्या रिंगणात विशेष मान 

इंदापूर येथील रिंगणात तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील महिलांना खेळण्यासाठी विशेष मान दिला जातो. आतापर्यंत तुकोबारायांचा पालखी सोहळा सोडता कोणत्याही पालखी सोहळ्यात महिलांना रिंगण खेळण्याची परवानगी नाही. देहू ते पंढरपूर पायी वारीत ज्या-ज्या ठिकाणी रिंगण किंवा मुक्काम असतो. त्यावेळी आमच्या महिला दिंडीचे सकारात्मक स्वागत केले जाते, असेही सुप्रियाताई म्हणाल्या.

एका महिन्यात दिंडीची तयारी

दिंडीची सर्व तयारी एका महिन्यात केली जाते. याची जबाबदारी विजयाताई साठे या पाहतात. सुरुवातीला महिलांची दिंडी असल्याने अनेकांनी मदत केली. दिंडीत लागणाऱ्या सर्व वस्तू म्हणजे भांडी, टाळ, पताका, जनरेटर हे सर्व साहित्य पहिल्याच वर्षी घेतले. आमच्या दिंडीत उच्चशिक्षित महिला, इंजिनिअर, डॉक्टर, शिक्षिका सहभागी होतात. वयाच्या आठव्या वर्षापासून कीर्तन केले. घरातील चौथी पिढी कीर्तन करते. घरातून आलेली वारीची आणि कीर्तनाची परंपरा जपण्याचा प्रयत्न सुप्रियाताई करत आहेत. 

Web Title: Supriya Sathe carried forward the legacy of women kirtankaras like men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.