बारामतीत सुप्रिया सुळे व युगेंद्र पवारांचे रस्त्यावर उतरून जन आक्रोश आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 16:05 IST2025-01-07T16:04:00+5:302025-01-07T16:05:09+5:30

कांद्याला आणि दुधाला हमीभाव मिळावा, ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीत वाढ व्हावी, दुधाला रास्त दर मिळावा या मागणीसाठी आंदोलन

Supriya Sule and Yugendra Pawar take to the streets in Baramati to protest public outcry | बारामतीत सुप्रिया सुळे व युगेंद्र पवारांचे रस्त्यावर उतरून जन आक्रोश आंदोलन

बारामतीत सुप्रिया सुळे व युगेंद्र पवारांचे रस्त्यावर उतरून जन आक्रोश आंदोलन

बारामती : बारामती शहरात राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे व युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी(दि ७) जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. मागील काही काळापासून कांदा व दूध दर सातत्याने घसरत आहेत. कांद्याला हमीभाव व दुधाला रास्त दर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

कांद्याला आणि दुधाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी खासदार सुळे, युगेंद्र पवार, तसेच पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांंच्यासह रस्त्यावर उतरल्या. बारामतीतल्या तीन हत्ती चौकात खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ठिय्या मांडला. खासदार सुळे यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. हाताला काळ्याफिती बांधून त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. बळीराजाचे राज्य येऊ दे, जगाचा पोशिंदा जगला पाहिजे. शेतकरी बचाव, देश बचाव अशा विविध घोषणांनी आंदोलन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.

केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात शुल्क लागू केल्यामुळे मागील दीड ते दोन वर्षांपासून कांद्याचे दर सातत्याने खाली येत आहेत. तसेच दूध दराबाबत देखील केंद्र व राज्य सरकारने सातत्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांची उपेक्षाच केली आहे. दूध व्यवसायावर अनेक ग्रामीण तरुण सध्या अवलंबून आहेत. मात्र दुधाला कमी दर मिळत असल्याने ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती घटली आहे. परिणामी ग्रामीण भागातील अर्थचक्र थंडावले असून दुधाला रास्त दर मिळाला तर हे चक्र पुन्हा एकदा धावू लागेल. तसेच जिरायती व बागायती क्षेत्रामध्ये देखील शेतकरी कांदा लागवड करत असतात. मात्र कांद्यावर निर्यात शुल्क लागू केल्यामुळे व्यापारी कांदा निर्यात करू शकत नाहीत. कांदा भारतीय बाजारात पडून राहिल्यामुळे कांद्याचे दर कमालीचे घसरले असल्याचे सुळे यांनी नमुद केले. यावेळी अॅड.एस.एन जगताप, अॅड संदीप गुजर,सत्यव्रत काळे,वनिता बनकर,आरती शेंडगे आदी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

Web Title: Supriya Sule and Yugendra Pawar take to the streets in Baramati to protest public outcry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.