‘त्या’ गटाला मुख्यमंत्रिपद देत भाजपने केला फडणवीस यांचा अपमान- सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 06:53 PM2023-02-23T18:53:25+5:302023-02-23T18:58:11+5:30
१०५ आमदार निवडून आले असताना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री का केले नाही?...
बारामती (पुणे) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपशी युती हवी होती. मात्र, मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस नको होते, असे वक्तव्य भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केले आहे. पत्रकारांनी याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांचे बारामती येथे बोलताना लक्ष वेधले. त्यावर सुळे यांनी त्यांचे १०५ आमदार निवडून आले असताना देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री का केले नाही? ४० आमदार असणाऱ्या गटाला मुख्यमंत्रिपद देत भाजपने फडणवीस यांचा अपमान केल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.
सुळे पुढे म्हणाल्या, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, १०५ आमदार असलेला राष्ट्रीय पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष पवार चालवतात एवढी त्यांची ताकद आहे. हे कबूल केल्याबद्दल मी भाजप प्रदेशाध्यक्षांचे आभार मानते, असा टोला सुळे यांनी लगावला.
सिलिंडरचा भाव महाग झाला आहे. कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी रस्त्यावर आला आहे. महागाई, बेरोजगारी आहे. सर्वसामान्यांना दोन वेळचे जेवण मिळत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे इतिहासात जाण्यात अर्थ नाही. इतिहासाचा अभ्यास कधीही करता येईल; पण आकडोंसे पेट नही भरता, जब भूख लगती है तो धान लगता आहे, हे सुषमा स्वराज यांचे वाक्य मला आठवतेय, असे ते म्हणाल्या. ज्या पद्धतीने सत्तेचा संघर्ष झाला, ज्या पद्धतीने दिल्लीच्या पक्षाने शिवसेना संपविण्याचा घाट घातला, यातून तुम्ही काय ते बघा. महाराष्ट्राच्या विरोधात एक मोठे षडयंत्र केंद्र करतेय, असे सुळे म्हणाल्या.
मराठी अस्मितेला धक्का पोहोचविणे, महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राच्या विरोधातील षड्यंत्र हे दिल्लीतून होतेय. त्यातून पहाटेच्या शपथविधीचा वारंवार उल्लेख होतो आहे. तो शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली नसती असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, परंतु त्यांच्या वक्तव्यातून त्यांना या शपथविधीची कल्पना होती का, हे सांगता येत नाही, मी वास्तवतेत जगते, इतिहासात नाही, असे त्या म्हणाल्या.
राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री २४ तास ‘इलेक्शन’ मोडमध्ये आहेत. राज्यात एमपीएससी परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. शिक्षक आंदोलन करत आहेत. एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. अंगणवाडी सेविकांचे प्रश्न आहेत. परंतु, हे लोक निवडणूक आयोग, न्यायालय यासाठी व स्वत:ची खुर्ची, स्वत:ची सत्ता वाचविण्यासाठी वेळ खर्ची घालत आहेत, असे खासदार सुळे म्हणाल्या. ईडी सरकार स्वत:ची खुर्ची वाचविण्यात व्यस्त असून, ते असंवेदनशील सरकार आहे. त्यांना सर्वसामान्यांचे काहीही देणेघेणे उरलेले नाही. अंगणवाडी सेविकांच्या वेदना त्यांना दिसत नाहीत, अशी टीका सुळे यांनी केली.
मराठी माणसाने काढलेला पक्ष...-
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी निश्चित केला होता. त्या बैठकीला राज ठाकरे यांच्यासह अन्य नेते हजर होते. राज ठाकरे यांनी मतभेद झाल्यावर स्वत:चा वेगळा पक्ष काढला. ते चिन्ह, पक्ष ओरबाडत बसले नाहीत. तशी संधी यांनाही होती. परंतु, एका मराठी माणसाने काढलेला पक्ष दिल्लीच्या तख्ताला सहन होत नसेल, त्यातून हे घडले आहे. परंतु, अखेर सत्याचा विजय होईल, असे सुळे म्हणाल्या.