सुप्रिया सुळे लागल्या कामाला : विधानसभेसाठी बोलावली बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 03:39 PM2019-05-27T15:39:06+5:302019-05-27T15:45:14+5:30
खासदार झाल्यावर सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेच्याही तयारीला लागल्या असून त्यांनी पुण्यात आल्यावर लगेचच पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यांची ही कृती बघता राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेसाठी आत्ताच कंबर कसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे : खासदार झाल्यावर सुप्रिया सुळे यांनी लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेच्याही तयारीला लागल्या असून त्यांनी पुण्यात आल्यावर लगेचच पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यांची ही कृती बघता राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेसाठी आत्ताच कंबर कसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यात पाच खासदार निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आगमी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. याचाच प्रत्यय पुण्यात दिसला असून नवनिर्वाचित खासदार झालेल्या सुळे यांनी शहरात पाऊल ठेवताक्षणीच ग्रामीण आणि शहरातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला त्यांच्या मतदारसंघातील सर्व पदाधिकाररी उपस्थित असून स्वारगेट येथील निसर्ग मंगल कार्यालयाजवळील त्यांच्या कार्यालयात ही बैठक झाल्याचे समजते. राष्ट्रवादीला लोकसभेत अपेक्षित यश मिळाले नसले तरी काँग्रेसइतकी त्यांची दाणून हार झालेली नाही. त्यामुळे हाच धागा पकडत मताधिक्य बघून त्यांनी विधानसभा मतदारसंघ टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेली मते आणि स्थानिक सक्षम उमेदवार असे गणित जुळवून लगेच तयारी सुरु केली तर त्यांना चांगला प्रतिसादही मिळू शकतो. हेच सव मुद्दे लक्षात घेत सुळे यांनी बैठक बोलावल्याचे समजते.
पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्येही निवडणुकीची घोषणा झाली असून त्यासाठीही पक्षाला उमेदवार उभे करायचे आहेत. त्याचीही चर्चा या बैठकीत होणार आहे. शिवाय विधानसभेचीही चर्चा होणार असून उमेवारांच्या नावाची प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे.
इंदापूरचे काय होणार ?
अजित पवार यांची विनंती विचारात घेऊन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सुळे यांना मदत केली आहे. तिथे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे असल्यामुळे आता पाटील यांच्या मदतीची परतफेड सुळे करणार का असा प्रश्न आहे. त्यामुळे या सगळ्या चर्चेत इंदापूरविषयी उत्सुकता आहे.