...आणि सुप्रिया सुळेंनी पुणे पाेलीस आयुक्तालयातून थेट लावला तक्रारदाराला फाेन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 05:30 PM2020-02-25T17:30:42+5:302020-02-25T17:31:56+5:30
खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पाेलीस आयुक्तालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विविध विभागाला भेट देत त्या विभागांची माहिती घेतली.
पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी पुणे पाेलीस आयुक्तालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीत त्यांनी आयुक्तालयातील भराेसा सेल आणि सेवा कक्षाला भेट देत तेथील माहिती घेतली. जवळपास दाेन तास सुळे यांनी या दाेन्ही उपक्रमांची माहिती घेतली. तसेच या दाेन्ही उपक्रमांचे काैतुक करत असे उपक्रम राज्याच्या इतर भागात देखील राबविण्याची विनंती गृहमंत्र्यांना केली.
नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुणे पाेलीस आयुक्तालयात भराेसा सेल आणि सेवा केंद्राची सुरुवात केली आहे. या दाेन्ही विभागांना सुळे यांनी भेट दिली. सेवा केंद्राच्या माध्यमातून पुण्यातील विविध पाेलीस स्टेशनमध्ये तक्रारदारांनी दाखल केलेल्या तक्रारींबाबत विचारपूस केली जाते. यात त्यांच्या तक्रारीवर याेग्य ती कारवाई झाली का, त्यांना याेग्य वागणूक मिळाली का याबाबत विचारणा केली जाते. आत्तापर्यंत पुण्यातील दाेन लाख तक्रारदारांचे अभिप्राय आयुक्तालयाकडून जाणून घेण्यात आले आहेत. या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण तसेच पाेलिसांना अधिक सक्षम करण्याचा आयुक्तालयाचा प्रयत्न आहे.
सुप्रिया सुळे यांनी या कक्षाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी अनेक तक्रारदारांना फाेन करुन तक्रारींची दखल घेतली का याबाबत विचारपूस केली. सुप्रिया सुळे यांनी वानवडी पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेल्या उद्य माने यांना फाेन केला. सुप्रिया सुळे फाेनवर असल्याचे ऐकून ते काहीकाळ आश्चर्यचकीत झाले. सुळे यांनी पाेलिसांनी तुमची तक्रार याेग्य प्रकारे ऐकून घेतली का तसेच पाेलिसांचे सहकार्य मिळाले का याबाबत विचारणा केली. त्यावर माने यांनी पाेलिसांनी सहकार्य केल्याचे सांगितले.