सुसंस्कृत सुप्रियांना ‘ ती ’ भाषा शोभत नाही : विजया रहाटकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 08:35 PM2019-04-18T20:35:49+5:302019-04-18T20:37:14+5:30
सुप्रिया सुळेंच्या भाषणाची जी क्लीप ऐकायला मिळत आहे; त्यावरुन तसे बोलणे त्यांना शोभत नाही एवढेच म्हणता येईल...
पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे या सुसंस्कृत आहेत. दोनदा त्या खासदार राहिल्या आहेत. मात्र त्यांच्या भाषणाची जी क्लीप ऐकायला मिळत आहे; त्यावरुन तसे बोलणे त्यांना शोभत नाही एवढेच म्हणता येईल, असे मत भाजपाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले.
भाजपा शिवसेना महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी आयोजित पत्रकार परिषदेत रहाटकर गुरुवारी (दि. १८) बोलत होत्या. बारामतीमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने भाजपात प्रवेश केल्यानंतर त्याला मोबाईल फोनवरुन सुळे यांनी दमबाजी केल्याची कथित ऑडियो क्लीप सध्या व्हायरल झाली आहे. या संदर्भात त्यांनी मतप्रदर्शन केले. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापौर मुक्ता टिळक, स्वरदा बापट यावेळी उपस्थित होते.
रहाटकर पुढे म्हणाल्या, की महागाई स्थिर ठेवण्यात या सरकारला यश आले. उज्वला गॅस योजनेचा ७ कोटी महिलांना, प्रधानमंत्री आवास योजनेचा २ कोटी महिलांना, शौचालय योजनेचा ९ कोटी महिलांना, मुद्रा योजनेचा १६ कोटी महिलांना आणि सौभाग्य योजनेचा २ कोटी महिलांना लाभ झाला आहे. यापुर्वीच्या सरकारने महिलांसाठी म्हणून कधीही अशा प्रकारचे काम केलेले नाही. देशातील समस्त महिलांना केंद्रस्थानी ठेवून विविध योजना अंमलात आणणारे मोदी सरकार हे देशातील पहिले सरकार आहे, त्यांच्यामुळेच देशातील २५ कोटी महिलांना वेगवेगळ्या माध्यमातून लाभ झाले, त्या सर्व महिला मोदी यांच्याच मागे या निवडणूकीत उभ्या राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोदी सरकारला जनतेचा पाठिंबा असल्याचे देशातील अनेक राज्यांमध्ये दौरा केल्यानंतर आढळले आहे. निवडणूकीनंतर पुन्हा एकदा भाजपाचेच सरकार येईल व मोदीच पंतप्रधान होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.