सुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 02:43 AM2019-01-22T02:43:56+5:302019-01-22T02:44:06+5:30
चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि प्रिसेन्स इ- मॅगॅझीनतर्फे देण्यात येणारा संसदरत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा प्रदान करण्यात आला.
बारामती : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि प्रिसेन्स इ- मॅगॅझीनतर्फे देण्यात येणारा संसदरत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा प्रदान करण्यात आला. तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते चेन्नई येथील राजभवनमध्ये सुळे यांना हा पुरस्कार देण्यात आला.
लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना प्राईम पॉईंट फाऊंडेशनतर्फे २०१० पासून संसदरत्न पुरस्कार देण्यात येतो. देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. खासदार सुळे यांची संसदेमधील उपस्थिती, चर्चासत्रांमधील सहभाग, उपस्थित प्रश्न आणि पटलावर मांडलेली खासगी विधेयके या सर्वच भागांमध्ये केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना संसदरत्न पुरस्कार देण्यात आला.
माजी निवडणूक आयुक्त टी. एस. कृष्णमुर्ती तसेच प्राईम पॉईंट फाऊंडेशन चे संस्थापक चेअरमन
के. श्रीनिवासन आदी या प्रसंगी उपस्थित होते.
विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सदैव प्रयत्नशील
प्राइम पॉईंट फाऊंडेशनने केलेला हा गौरव नक्कीच माझा आनंद द्विगुणित करणारा आहे. हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सदैव प्रयत्नरत आहे. हा संसदरत्न पुरस्कार बारामती लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचा गौरव आहे, असे मी मानते. अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.