Supriya Sule: मी ते पुस्तक वाचलंय, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर सुप्रिया सुळेंचा सर्वांनाच सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 03:21 PM2022-05-11T15:21:15+5:302022-05-11T15:27:06+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईत मनसेचे प्रमुख नेते आणि प्रवक्त्यांची महत्वाची बैठक झाली
मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन राजकारण तापलं आहे. राज ठाकरेंच्या विरोधात उत्तर भारतीय खासदारांसह अनेकजण एकत्र येऊन त्यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करत आहेत. तर, काहीजण समर्थनार्थही भूमिका मांडत आहेत. त्यामुळे, राज ठाकरेंचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. ते 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. त्यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारला असता त्यांनी सर्वांनीच भारत देश फिरला पाहिजे, असे उत्तर दिलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईत मनसेचे प्रमुख नेते आणि प्रवक्त्यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत अयोध्या दौऱ्याबाबत माध्यमांशी बोलताना संयम बाळगण्याबाबत मनसे अध्यक्षांनी नेत्यांना मार्गदर्शन केलं. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी या बैठकीनंतर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना खासदार बृजभूषण सिंह यांनी दिलेल्या धमकी आणि केलेल्या विधानालाही संयमी उत्तर दिलं. बृजभूषण शरण सिंह आपली भावना व्यक्त करत आहेत. त्यावर पक्षप्रमुख बोलतील. एका खासदाराने मांडलेलं मत हे संपूर्ण उत्तर प्रदेशचं असू शकत नाही, असे नांदगावकर यांनी म्हटलं. यासंदर्भात सुप्रिया सुळेंना प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांनी भारत दर्शन सर्वांनीच करायला हवं, असे उत्तर दिलं.
''भारत हा सुंदर देश आहे. माझी सर्वच भारतीयांना विनंती आहे, कश्मीर ते कन्याकुमारी सगळ्यांनीच भारत दर्शन करावे. पंडित जवाहरलाल नेहरुंनी भारत एक खोज हे अप्रतिम पुस्तक लिहलं आहे, मी ते पुस्तक वाचलंय आणि देशही फिरले आहे. तसंच, सगळे करत असतील तर ते देशासाठी चांगलंच आहे,'' असे उत्तर सुप्रिया सुळेंनी दिले.
राज ठाकरेंना धमकीचं पत्र - नांदगांवकर
"माझ्या लालबागच्या कार्यालयात काल एक धमकीचं पत्र प्राप्त झालं आहे. त्यात मला आणि राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत मी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज मी राज ठाकरेंना ते पत्र दाखवलं व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटून संबंधित पत्र त्यांच्याकडे दिलं आहे. आता ते याबाबत चौकशी करतील. गृहमंत्र्यांनी तातडीनं पोलीस आयुक्तांशी बोलून याचा तपास करण्याचं आश्वासन मला दिलं आहे. पण एक सांगतो. मला दिलेली धमकी एक वेळ ठीक. पण राज ठाकरे यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटून उठेल हे राज्य सरकारनं लक्षात ठेवावं", असं बाळा नांदगावकर म्हणाले.