नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी ठाेस पावले उचलावे- सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 08:49 AM2022-12-08T08:49:54+5:302022-12-08T08:51:47+5:30
नुकतेच या भागात ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ४० वाहनांचे मोठे नुकसान झाले...
पुणे : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील नवले पूल परिसरात होत असलेल्या अपघाताबाबत लोकसभेत आवाज उठवला.
लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत रस्ते सुरक्षेसंदर्भात सुप्रिया सुळे यांनी कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल परिसरात होत असलेल्या अपघात मालिकेसंदर्भातील मुद्दा मांडला. सुळे म्हणाल्या की, रस्ते सुरक्षेचं मोठं आव्हान आपल्या देशासमोर आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला भागातल्या नवले पूल परिसरात २०२१ पासून १७जणांचा अपघातांमध्ये मृत्यू झाला, तर २४जण गंभीररीत्या जखमी झाले. नुकतेच या भागात ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ४० वाहनांचे मोठे नुकसान झाले.
हा परिसर ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. यापूर्वी केलेल्या उपाययोजनांमुळे अपघाताची मालिका थांबली होती. परंतु पुन्हा अपघात होऊ लागले आहेत. यासंदर्भात महामार्ग प्राधिकरणाशी चर्चा झाली असली तरी नवले पूल अपघात शून्य व्हावा यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना व भक्कम पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी वाहतूकमंत्री यांनी यात लक्ष घालण्याची आवश्यकता आहे, असेही खासदार सुळे म्हणाल्या.