"नुसते मेळावे घेऊन महागाई कमी होणार नाही"; सरकारच्या कारभारावर सुप्रिया सुळेेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 05:17 PM2022-10-06T17:17:36+5:302022-10-06T17:21:06+5:30
बारामती लोकसभा मतदारसंघातील गाव दौऱ्यावेळी सुप्रिया सुळेंचे वक्तव्य...
यवत (पुणे) : दिवाळीच्या तोंडावर घरगुती गॅस सिलिंडरचे भाव वाढविले. आता गोरगरिबांनी त्यांच्या पोरांना मोबाईलवर फराळाचे फोटो दाखवायचे का? नुसते मेळावे घेऊन महागाई कमी होणार आहे का ? असा सवाल बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
दौंड तालुक्याच्या पश्चिम व जिरायत पट्ट्यातील गावांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी दौरा केला. यावेळी कासुर्डी (ता. दौंड) येथे २ कोटी १० लाख रुपये निधीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत बाळासाहेब टेकवडे यांनी केले.
यावेळी माजी आमदार रमेश थोरात, दौंड तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार, मधुकर दोरगे, नितीन दोरगे, वीरधवल जगदाळे, वैशाली नागवडे, राणी शेळके, पांडुरंग मेरगळ, कुंडलिक खुटवड, राहुल दिवेकर, तुषार थोरात, योगिनी दिवेकर, वंदना मोहिते, रामभाऊ टुले, विठ्ठल दोरगे, सदानंद दोरगे, कासुर्डीच्या सरपंच धनश्री विशाल टेकवडे, गणपत आखाडे, दौलत ठोंबरे, तुकाराम भोंडवे, बंडोपंत गायकवाड, हनुमंत आखाडे, पांडुरंग आखाडे, दीपक आखाडे, कासुर्डीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधत केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कारभाराविरोधात जोरदार टीका केली. सर्वसामान्य नागरिक महागाई व बेरोजगारीने त्रासला असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी भलत्याच गोष्टींमध्ये शासन व्यस्त आहे. मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडीच्या सरकारने चांगले काम केले होते. आता सरकार गेले याचे दु:ख नाही. मात्र खोके घेऊन जे गेले त्याचे दु:ख आहे. सर्वसामान्य जनतेसाठी नाही तर स्वत:च्या स्वार्थासाठी हे गेलेले आहेत. दिवसेंदिवस महागाई वाढणार आहे. देश आज ना उद्या अडचणीत येईल हे आम्ही आधीच सांगत होतो. आता तेच आरएसएसवाले सांगत आहेत. त्यांचेही जाहीर आभार खासदार सुळे यांनी दौऱ्यात व्यक्त केले.
पडवी, देऊळगाव गाडा, खोर, भांडगाव, यवत, कासुर्डी, भरतगाव, ताम्हनवाडी व बोरीऐंदी येथे गाव भेट दौरा खासदार सुळे यांनी केला. यावेळी विविध गावातील नागरिकांनी त्यांच्या अडीअडचणी संदर्भातील निवेदने त्यांना दिली.