छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांची पाठराखण करणारं सरकार! सुप्रिया सुळेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 02:28 PM2022-11-24T14:28:12+5:302022-11-24T14:29:25+5:30

सुळे म्हणाल्या, वीजप्रश्नी राज्यभर आंदोलन उभे करणार...

Supriya Sule said The government that supports those who insult Chhatrapati | छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांची पाठराखण करणारं सरकार! सुप्रिया सुळेंचा घणाघात

छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांची पाठराखण करणारं सरकार! सुप्रिया सुळेंचा घणाघात

googlenewsNext

कुरकुंभ (पुणे) : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना हे सरकार पाठीशी घालत असून, प्रलोभने देणे अन्यथा विविध तपास यंत्रणांची भीती दाखवणे एवढी दोनच कामे या सरकारला येत आहेत. ‘मी बदला घेतला’ या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे ते कधी कधीच खरे बोलतात, असा घणाघात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

दौंड तालुक्यातील जिरेगाव येथे गाव भेट दौऱ्यादरम्यान त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सारिका पानसरे, राणी शेळके, योगिनी दिवेकर, जयश्री भागवत, आप्प्साहेब पवार, तुषार थोरात, उत्तम आटोळे, जिरेगावचे सरपंच भरत खोमणे, कौठडीच्या सरपंच जयश्री मेरगळ, इतर ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सध्या राज्यात थकीत वीज बिल प्रश्नावरून बराच गदारोळ सुरू असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. आधीच अधिकच्या पावसाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला वीज प्रवाह खंडित करून आणखी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावरदेखील त्यांनी बोट ठेवले असून, सध्या वाढत्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार असल्याचेदेखील त्यांनी नमूद केले.

दौंड तालुक्यातील जिरेगाव, कौठडी, मळद, रावणगाव, नंदादेवी व अन्य गावात गावभेट दौरा आयोजित करून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत. दुधावर व इतर अन्नपदार्थांवर लावलेल्या जीएसटीने सर्व सामान्य नागरिक त्रस्त असून, या सरकारला येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवावा लागणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. जिरेगाव येथील शेतकऱ्यांनी वीजप्रवाह खंडित होत असल्याच्या अडचणी सांगताना यावर उपाययोजना करण्याची मागणी केली. शेतकऱ्याला केंद्रबिंदू ठेवूनच सरकारची धोरणे असणे गरजेचे असल्याचे मत सुळे यांनी व्यक्त केले.

पालकमंत्र्यांना शोधणार

गेली तीन महिन्यांपासून जिल्ह्याचे पालकमंत्री कुठे आहेत, याचा पत्ताच नसल्याने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत व त्यामुळे विकासकामांचा वेग मंदावला आहे. परिणामी, आधी पालकमंत्र्यांना शोधावे लागणार. अशा शब्दांत त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला.

Web Title: Supriya Sule said The government that supports those who insult Chhatrapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.