देशातील 'टॉप-टेन'मध्ये पुणे जिल्ह्यातील दोन खासदार; सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणेंनी मारली बाजी
By विश्वास मोरे | Published: March 24, 2023 03:20 PM2023-03-24T15:20:08+5:302023-03-24T15:20:42+5:30
महाराष्ट्रातील अन्य तीन खासदार पहिल्या दहामध्ये आहेत...
पिंपरी : लोकसभेच्या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे 'गेट वे पॉलिटिकल स्टॅटेजिक' संस्थेमार्फत सतराव्या लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिल्या सत्रापर्यंतच्या देशातील खासदारांच्या कामगिरीचे विश्लेषण केले. त्यानुसार संसदेतील कामकाजात सक्रिय सहभागी होणाऱ्या 'टॉप-टेन'मध्ये पहिल्या स्थानावर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे तर दुसऱ्या स्थानावर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे. १४८ वेळा चर्चेत सहभाग आणि ५०८ प्रश्न विचारत खासदार बारणे यांनी दुसरा क्रमांक पटकाविला आहे. महाराष्ट्रातील अन्य तीन खासदार पहिल्या दहामध्ये आहेत.
देशाच्या लोकसभेतील खासदारांच्या कामाचे मुल्यांकन केले जाते. त्यानुसार सतराव्या लोकसभेतील खासदारांच्या कामगिरीचे मुल्यांकन केले आहे. त्यातील पहिल्या दहा खासदारांची यादी लोकसभेच्या संकेतस्थळावर अधिकृत प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये पहिल्या स्थानावर बारामतीच्या सुप्रिया सुळे आणि दुसऱ्या स्थानांवर श्रीरंग बारणे दुस-या स्थानावर आहेत. शिवसेनेचे श्रीकातं शिंदे आठव्या आणि राहुल शेवाळे नवव्या स्थानी आहेत.
महाराष्ट्रातील अन्य तीन खासदार पहिल्या दहामध्ये आहेत. भाजपचे तीन, शिवसेनेचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचा एक आणि डीएमकेचे दोन असे खासदार पहिल्या दहाच्या यादी आहे. बारणे यांनी आत्तापर्यंत सतराव्या लोकसभेत ५०८ प्रश्न विचारले आहेत. १४८ वेळा चर्चेत सहभाग घेतला. सभागृहातील उपस्थितीती ९४ टक्के असून दहा टक्के खासगी विधेयके मांडली आहेत. सोळाव्या लोकसभेत देखील कामकाजात खासदार बारणे अग्रभागी होते. सतराव्या लोकसभेतही खासदार बारणे यांनी आपले स्थान कायम ठेवले आहे.