सुप्रिया सुळेच निवडून येतील; बारामतीच्या खडकवासला मतदार संघातील नागरिकांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 01:16 PM2024-04-17T13:16:45+5:302024-04-17T13:18:11+5:30
सुनेत्रा पवार यांना आम्ही अजित दादांच्या पत्नी म्हणूनच ओळखतो. त्या कधी आमच्या भागात आल्या नाहीत
पुणे : बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे. बारामतीत होणारी ही लढत राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचाच भाग असणाऱ्या खडकवासला मतदार संघातून सुप्रिया सुळेंचं नाव मोठ्या प्रमाणावर घेतलं जातंय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकमत प्रतिनिधींनी खडकवासला मतदार संघातील नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी या भागात सुप्रिया ताईंनी विकासकामे केली असल्याने त्याच निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदार संघाची देशात चर्चा सुरु झाली आहे. या मतदार संघातून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. तर सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत. या नणंद भावजय लढतीत बारामतीकर कोणाला साथ देणार? याकडे देशाचे लक्ष लागून आहे. बारामतीत राष्ट्रवादीत फूट पडण्याअगोदर अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनी विकासकामे केली असल्याचे नागरिकांनी सांगितले. परंतु आता मात्र साथ कोणाला मिळेल याबाबत सगळ्यांना प्रश्न पडताना सुप्रिया सुळेंचे नाव चर्चेत आले आहे.
आमच्या भागात सुप्रिया सुळेंनी अनेक विकासकामे केली आहेत. त्या नेहमी आम्हाला भेटायला येत होत्या. आमच्या अनेक समस्यांचे निराकारणही त्यांनी केले आहे. त्यामुळे आम्ही सुप्रिया सुळे यांनाच मतदान करणार आहोत. त्या नक्की निवडून येतील असे खडकवासला मतदार संघातील नागरिकांनी सांगितले. तर सुनेत्रा पवार यांना आम्ही अजित दादांच्या पत्नी म्हणूनच ओळखतो. त्या कधी आमच्या भागात आल्या नाहीत. आता निवडणुकीच्या अनुषंगाने भेटीसाठी येत आहेत. त्यामुळे त्यांची कामे आम्हाला माहित नाहीत. अशा प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांच्याबाबत नागरिकांनी दिल्या आहेत.