बाप अखेर बापच! लेकीच्या विजयासाठी बारामती मतदार संघ पिंजला अन् विजय खेचून आणला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 05:41 PM2024-06-05T17:41:28+5:302024-06-05T17:41:47+5:30

पाठिशी कोणीही नसताना शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची पुन्हा नव्याने मोट बांधत बाप अखेर बापच असतो, हे बारामतीच्या निकालाने दाखवून दिले

supriya sule win baramati lok sabha matdar sangh support sharad pawar | बाप अखेर बापच! लेकीच्या विजयासाठी बारामती मतदार संघ पिंजला अन् विजय खेचून आणला

बाप अखेर बापच! लेकीच्या विजयासाठी बारामती मतदार संघ पिंजला अन् विजय खेचून आणला

दुर्गेश मोरे 

पुणे : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांचा १ लाख ५३ हजार इतक्या मतांनी विजय झाला आहे. उतरत्या वयात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सोडलेली साथ त्याचबरोबर वादग्रस्त वक्तव्ये याचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बसला. विशेष म्हणजे आमदारापासून ते ग्रामपंचायत सरपंच, सदस्यासह सोसायटीचे सभासद हे आपलेच असल्याचा अतिआत्मविश्वासही अजित पवारांना नडला. दरम्यान, शरद पवार यांच्या वयावरून त्यांचे राजकीय अस्तित्व लयाला जाणार, अशा चर्चा झडत होत्या. पाठिशी कोणीही नसताना शरद पवार यांनी कार्यकर्त्यांची पुन्हा नव्याने मोट बांधत बाप अखेर बापच असतो, हे बारामतीच्या निकालावरून दाखवून दिले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार, नणंद-भावजय अशी लढत पाहायला मिळणार, असे चित्र उभे केले होते. मात्र, खरी लढत ही ज्येष्ठ नेते शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच होती. राष्ट्रवादीतून फूट पडून अजित पवार गट थेट महायुतीच्या सत्तेत सहभागी झाला. इतकेच नाही, तर अजित पवारांसह भाजपच्या नेत्यांनी थेट शरद पवार यांना वयावरून टार्गेट केले. बारामती लोकसभा मतदारसंघातील केंद्रीय स्तरावरील जी काही कामे अपूर्ण आहेत, ती सोडवण्यासाचे आश्वासन अजित पवारांनी दिले. त्यामध्ये जिरायती भागातील पाणी प्रश्न, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ, भाेरच्या औद्योगिक वसाहतीचा समावेश होता. याशिवाय बारामतीचा ज्या पद्धतीने विकास केला आहे. त्याच पद्धतीने इतर तालुक्यांचाही विकास करण्यावर भर देणार असल्यचेही आश्वासन दिले. मात्र, या विकासकामांचा लोकांवर कोणताही परिणाम झालेला दिसला नाही. यामागील प्रमुख कारण म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उतारवयात त्यांच्या पक्षात पाडलेली फूट हा लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला. त्यामुळे मतदारसंघातील संपूर्ण जनमत हे सुप्रिया सुळे यांच्या पाठिशी उभे राहिले.

राष्ट्रवादीपासून दुरावलेल्यांची बांधली मोट

अजित पवारांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावलेले नेते मंडळी, तसेच काही महत्त्वाच्या लोकांशी शरद पवार यांनी थेट संपर्क साधला. केवळ संपर्कावर थांबले नाही, तर त्यांच्या घरी जाऊन त्यांना आपलेसे केले. विशेष म्हणजे शरद पवारांच्या या खेळीमुळे विस्कटलेल्या कार्यकर्त्यांची मोट पुन्हा एकदा बांधली गेली. भोरचे माजी मंत्री अनंतराव थोपटे, तसेच माजी मंत्री दादा जाधवराव, पृथ्वीराज जाचक यांचीदेखील भेट घेत साथ देण्याची साद घातली. इंदापूर तालुक्यात प्रवीण माने महायुतीत सामील झाल्यानंतर पवारांनी इंदापूरचे आप्पासाहेब जगदाळे, भरत शहा या नेत्यांना आपलेसे केले. दुसरीकडे हर्षवर्धन पाटील, वियज शिवतारे आणि पवार कुटुंबीयांचे सख्ख सर्वांना माहीत असतानाही अजित पवारांनी भाजपच्या मदतीने पाटील, शिवतारे यांच्याशी जुळवून घेतले. याचा उलट परिणाम दिसला. या घडामोडी बारामतीकरांनाच नाही, तर इतर तालुक्यांतील लाेकांनाही रुचल्या नाहीत.

घटकपक्षांनी पाळला आघाडी धर्म

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे भवितव्य घडवले. आजही तिच परंपरा कायम राहिली आहे. अशा स्थितीमध्ये अजित पवार यांनी संपूर्ण कुटुंबाच्या विरोधात जाऊन भाजपला साथ दिली. शरद पवारांवर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी केली. याशिवाय शरद पवार गटात गेलेल्या अनेक कार्यकर्त्यांना साम, दाम, दंड भेद वापरून पुन्हा आपल्या गटात घेतले. साहेब की दादा यावर बारामतीकरांनी देखील मौन पाळले होते. त्यामुळे शरद पवार एकटेच दिसत होते. मतदानाच्या पूर्वसंध्येपर्यंतही अजित पवार मैदान मारणार अशीच चर्चा सुरू होती. मात्र, मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून सुप्रिया सुळेंनी आघाडी घेतली होती. ती शेवटपर्यंत कायम ठेवली. यामागील प्रमुख कारण म्हणजे सहाही विधानसभा मतदारसंघांतील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आघाडी धर्म पाळलाच शिवाय शरद पवारांच्या पाठिमागे जनतेची सहानुभूतीची लाट तयार झाल्याने सुळेंचा विजय सुकर झाला. त्यांनी तब्बल १ लाख ५३ हजार मतांनी विजय मिळवला.

Web Title: supriya sule win baramati lok sabha matdar sangh support sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.