गणाधिपतीसमोर ‘सूरमैफल’; संगीताची सेवा करणाऱ्या कुटुंबाचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 03:12 AM2018-09-19T03:12:28+5:302018-09-19T03:12:47+5:30
संगीत क्षेत्रातील एका कलासक्त कुटुंबाच्या घरात चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या श्रीगणेशासमोर दहा दिवसांच्या मैफलीद्वारे सुरांचा अनोखा नजराणा पेश केला जातोय.
- नम्रता फडणीस
पुणे : संगीत क्षेत्रातील एका कलासक्त कुटुंबाच्या घरात चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या श्रीगणेशासमोर दहा दिवसांच्या मैफलीद्वारे सुरांचा अनोखा नजराणा पेश केला जातोय. ना मोठा स्वरमंच ना प्रथितयश कलाकार. केवळ उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हेच या मैफलीचे वैशिष्ट्य आहे. प्रसिद्ध गायिका अपर्णा गुरव व त्यांच्या कुटुंबीयांनी यंदाच्या वर्षीपासून घरातच ही सूरमैफल सुरू केली आहे.
कलानिधी प्रस्तुत आणि गणपती संगीतोत्सव २०१८ च्या माध्यमातून ही मैफल होत आहे. अपर्णा गुरव, त्यांची मुलगी व सून तिघीही गायिका, पती मिलिंद गुरव आणि मुलगा प्रणव गुरव तबलावादक असे हे कलेची नि:स्पृहपणे सेवा करणारे कुटुंब. एक कलाकार दुसºया कलाकाराचे कौतुक करायला फारसे पुढे येत नाही. पण हे कुटुंब इतर कलाकारांच्यादेखील कलेला प्रोत्साहन देण्याचे काम अत्यंत मनापासून करीत आहे, हेच या कुटुंबाचे मोठेपण म्हणता येईल. घरात सजणाºया या अभिनव मैफलीविषयी ‘लोकमत’शी बोलताना गायिका अपर्णा गुरव म्हणाल्या, आमच्या ‘कलानिधी’ संस्थेद्वारे सदस्य नोंदणीच्या माध्यमातून वर्षभर विविध सांगीतिक कार्यक्रम राबविले जातात. जेव्हा घरातच सूरमैफल आयोजित करण्याची कल्पना पुढे आली तेव्हा अनेक कलाकारांनी उत्साह दाखवित या उपक्रमाला पसंती दर्शविली. त्यामुळेच यंदाच्या वर्षीपासून आम्ही घरातल्या कलाधिपतीसमोर या मैफलीचा ‘श्रीगणेशा’ केला. गायन- वादन अशा द्विसंगमातून साकार झालेल्या या दहा दिवसीय मैफलीत नवोदित कलाकारांचे अविष्कार ऐकण्याची संधी रसिकांना मिळत आहे. जे युवा कलाकार संगीतविश्वात फारसे प्रसिद्ध नाहीत, मात्र कलेमध्ये पारंगत आहेत त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. दहा दिवस रोज तीन कलाकारांचे या मैफलीत सादरीकरण होत आहे. घरातील जागा मर्यादित असली तरी रसिकमंडळी या मैफलीचा मनापासून आस्वाद घेत आहेत.
दि. १३ ते १८ सप्टेंबर या पाच दिवसांत श्रृती बुजरबरूआ, साई ऐश्वर्य महाशब्दे ( गायन), रोहन भडसावळे (तबला सोलो), सैलुशा वाडपल्ली, उमेश साळुंके, जयंत केजकर (गायन), अनय गाडगीळ (हार्मोनिअम सोलो), अक्षता गोखले, केदार केळकर (गायन), रोहित मुजुमदार, विशाल मोघे (गायन), प्रणव गुरव (तबला सोलो),
आदित्य जोशी, धनश्री घाटे (गायन), श्रीनिधी गोडबोले, भक्ती खांडेकर, अलकनंदा वैद्य (गायन) या
युवा कलाकारांनी आपली कलासेवा सादर केली आहे.
पुढील चार दिवस सादरीकरण करणारे कलाकार
दि. १९ सप्टेंबर : नीरज गोडसे , कोमल साने गुरव (गायन),
रवी गाडगीळ (सतार)
दि. २0 सप्टेंबर : मिलिंद गुरव (तबला सोलो), मानसी कुलकर्णी (गायन), ॠचा बेडेकर, उज्जैन (सरोद)
दि. २१ सप्टेंबर : आदिश्री पोटे, श्रृती गुरव, ललित देशपांडे (गायन)
दि. २२ सप्टेंबर : सावनी तळवलकर-गाडगीळ (तबला सोलो), अपर्णा गुरव (गायन)