वाहतूककोंडीचा ‘सरचार्ज’ प्रवाशांच्या माथी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 10:50 AM2019-11-25T10:50:14+5:302019-11-25T10:56:18+5:30
दिल्लीप्रमाणे पुण्यातही सरचार्ज आकारू नये
पुणे : वाहतूककोडींने त्रस्त झालेल्या पुणेकरांच्या खिशावरही ताण पडत आहे. शहरात सुरू असलेल्या ओला, उबेर व अन्य कंपन्यांच्या कॅब प्रवासादरम्यान वाहतूककोंडीमुळे प्रवाशांना सरचार्ज म्हणजे अतिरिक्त पैसे द्यावे लागत आहेत. नवी दिल्लीतील वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर तेथील कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी गर्दीच्या वेळी सरचार्ज न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसाच निर्णय पुणेकरांसाठी कधी होणार, असा अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहरामध्ये बहुतेक प्रमुख रस्त्यांवर वाहनचालकांना वाहतूककोंडीचा दररोजच सामना करावा लागत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरे तसेच शहरालगतच्या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. मागील काही महिन्यांपासून शहरात ठिकठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्याने या कोंडीत आणखी भर पडली आहे. स्वारगेट ते हडपसर, नगर रस्ता, चांदणी चौक, कर्वे रस्ता, हिंजवडी, येरवडा, मुंढवा, शिवाजीनगर, पुणे स्टेशन यांसह अन्य भागांमध्ये सातत्याने वाहतूककोंडी होत असते. याचा फटका सर्वसामान्य पादचाºयांनाही सहन करावा लागतोय. कोंडीमुळे वेळ आणि इंधनही मोठ्या प्रमाणावर वाया जाते. तसेच वाहनचालकांना मानसिक आणि शारीरिक त्रासही होतो. त्याचप्रमाणे प्रवाशांना आर्थिक भारही सोसावा लागत आहे.
शहरात ओला, उबेर व अन्य कंपन्यांची कॅबसेवा सुरू आहे. या कॅब वाहतूककोंडीमध्ये अडकल्यानंतर त्यांच्या कडून प्रतिमिनिटाला अतिरिक्त शुल्क म्हणजे सरचार्ज आकारले जाते. सर्व कंपन्यांचे शुल्क वेगवेगळे आहे. साधारणपणे १ ते दीड रुपयांपर्यंत हे शुल्क घेतले जाते. प्रत्यक्ष कॅब बुक केल्यानंतर येणारे भाडे आणि वाहतूककोंडीत अडकल्यानंतर अंतिमत: येणारे भाडे यामध्ये फरक पडत आहे. पीएमपी प्रवासी मंचचे संजय शितोळे यांनी सांगितलेल्या अनुभवानुसार, ‘अंतिम बिलामध्ये बिबवेवाडी ते भोसरी या प्रवासादरम्यान पहिले १५ किलोमीटर अंतरासाठी १२० रुपयांचे भाडे दाखविले. तर शेवटच्या ११.६ किलोमीटरसाठी १८५.६ रुपये भाडे घेण्यात आले आहे. शेवटच्या काही किलोमीटरमध्ये झालेल्या वाहतूककोंडीमुळे पहिल्या १५ किलोमीटरपेक्षा ६५ रुपये अधिकचे भाडे द्यावे लागले. बेसिक फेअर, डिस्टन्स फेअर, राईड फेअर, टोल फी, टॅक्स या सर्वांचे मिळून एकूण भाडे ३६२ रुपये द्यावे लागले. त्यामध्ये वाहतूककोंडीमुळे ४२ रुपये अधिकचे भाडे झाले.’ असाच अनुभव इतर प्रवाशांना येत आहे.
.........
४वाहतूककोंडीमध्ये अडकल्यानंतर आकरण्यात येणाºया सरचार्जबाबत ओला कंपनीच्या अधिकाºयांशी संपर्क करण्यात आला. मात्र, त्यांच्या जनसंपर्क विभागाकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळणार नाही, असे सांगण्यात आले. कंपनीने लावलेल्या सरचार्जची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याला शासनानेही मान्यता दिलेली आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
...........
ओला, उबेरकडून मिनिटाप्रमाणे भाडे आकारले जात आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढला की त्यानुसार भाडे वाढत जात आहे. वाहतूककोंडी, रस्त्यावरील खड्डे यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो. त्याचा भुर्दंड नागरिकांना पडतो. कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून टोल घेतला जातो. पण रस्त्यांची सुधारणा होत नाही. त्यामुळे वाहतूककोंडीत वाहन अडकल्यानंतर त्याचा भुर्दंड प्रवाशांकडून घेतला जाऊ नये.- संजय शितोळे, प्रवास
........
नवी दिल्लीमध्ये कॅब कंपन्यांनी वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी सोमवार ते शनिवार या कालावधीत कोणताही सरचार्ज न आकारण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. दिल्लीमध्ये वाहतूककोंडीचे संकट मोठे आहे. त्यामुळे प्रवाशांना कॅबमधून प्रवास करताना खूप आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. यापार्श्वभूमीवर पुण्यातही असा निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.