सुरेश भट यांच्या कवितांना संगीताचे कोंदण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:08 AM2021-06-04T04:08:46+5:302021-06-04T04:08:46+5:30
मंदार आगाशे यांचा पुढाकार : ऑनलाईन कार्यक्रमात होणार प्रकाशन लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लॉकडाऊनच्या काळात संगीतकार मंदार आगाशे ...
मंदार आगाशे यांचा पुढाकार : ऑनलाईन कार्यक्रमात होणार प्रकाशन
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लॉकडाऊनच्या काळात संगीतकार मंदार आगाशे यांनी कविवर्य सुरेश भट यांच्या कविता संगीतबद्ध करत रसिकांच्या भेटीस आणल्या आहेत. ‘ठीक आहे छान आहे मस्त आहे’ या अल्बमची त्यांनी निर्मिती केली आहे. या रचना प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांच्यासह आर्या आंबेकर, प्रांजली बर्वे, धनश्री देशपांडे-गणात्रा यांनी गायल्या असून, या अल्बमचे प्रकाशन ५ जूनला ऑनलाइन कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
कविवर्य सुरेश भट यांच्या ‘सप्तरंग’ या अखेरच्या काव्यसंग्रहातील वीस वेगवेगळ्या कवितांचा ‘ठीक आहे छान आहे मस्त आहे’ या म्युझिक अल्बममध्ये समावेश आहे. या गाण्यांचे संगीत संयोजन विवेक परांजपे यांनी केले आहे. हवाईन गिटारसारख्या वाद्याबरोबरच ६० ते ७० च्या दशकातील संगीताचा अनुभव देणाऱ्या विविध वाद्यांचा वापर या संगीत रचनांमध्ये करण्यात आला आहे.
मंदार आगाशे म्हणाले, ‘‘लॉकडाऊनच्या काळात हा काव्यसंग्रह वाचत असताना मला त्यातील कविता संगीतबद्ध कराव्या वाटल्या. रोज एक याप्रमाणे वीस दिवसांत वीस कविता संगीतबद्ध केल्या. कालातीत शब्द, श्रवणीय संगीत यांचा मिलाफ या गाण्यांमध्ये झाला आहे. आधुनिक संगीताचे घटक असलेले, पण जुन्या काळातील गाण्यांची आठवण करून देणारे हे संगीत आहे. हा म्युझिक अल्बम संगीतप्रेमींच्या नक्कीच पसंतीला उतरेल, याची खात्री वाटते.’’ अल्बमचे प्रकाशन ५ जून रोजी रात्री ८.३० वाजता ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांना विनामूल्य पाहता येईल.