‘कट्यार’मध्ये चार गाणी गाऊन महेश काळे झाले मोठे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 01:43 PM2020-02-25T13:43:10+5:302020-02-25T13:47:42+5:30
महाराष्ट्र साहित्य परिषदेत तळवलकर यांच्याशी ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी संवाद साधला. बेगम अख्तर, बालगंधर्व, गजाननबुवा जोशी, नागेशकर गुरुजी, निवृत्तीबुवा अशा दिग्गजांच्या स्मृती तळवलकर यांनी जागवल्या. आजकाल चलती कोणाची याची स्पर्धा लागलेली असते, त्यामुळे साधनेचे मोल कमी होत चालले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
पुणे : ‘परंपरेमध्येच अभिजातता मिळते. परंपरेला मानवणारी नवता असली पाहिजे. परंपरा घाबरली तर नवतेला अर्थ राहत नाही. शास्त्राला लवचिक करणारे प्रतिभावंत कलाकार होऊन गेले. आविष्कार हा तंत्र, विद्या, बुद्धी की मनातून होतोय हे कळले पाहिजे. बंदिश आणि रचना यातील फरक समजला पाहिजे,’ असे मत ज्येष्ठ तबलावादक पं. सुरेश तळवलकर यांनी व्यक्त केली. ‘कट्यार’मध्ये चार गाणी गाऊन महेश काळे मोठे झाले, असा टोलाही त्यांनी लगावला.
‘‘संगीत कुठे आणि आपण कुठे आहोत, असा प्रश्न पडण्याचा सध्याचा काळ आहे. संगीतात आता केवळ सर्टिफिकेट घेण्याचे दिवस उरले आहेत. स्वत:ला आचार्य म्हणवून घेऊन लोक दुकाने उघडू लागले आहेत. संगीत ही योगक्रिया आहे. शरीर, बुद्धी, मन आणि आत्मा या चार स्तरांवर संगीत विकसित होते. मात्र, आता शिकण्या-शिकवण्याची गंमत पूर्वीपेक्षा कमी झाली आहे,’’ अशी खंत पं. तळवलकर यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेत तळवलकर यांच्याशी ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांनी संवाद साधला. त्यावेळी तळवलकर यांनी गुरु-शिष्य परंपरा, साधनेचे महत्व, संगीताची जादू अशा विविध मुद्दयांवर भाष्य केले. कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी. कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार आदी यावेळी उपस्थित होते.
बेगम अख्तर, बालगंधर्व, गजाननबुवा जोशी, नागेशकर गुरुजी, निवृत्तीबुवा अशा दिग्गजांच्या स्मृती तळवलकर यांनी जागवल्या. आजकाल चलती कोणाची याची स्पर्धा लागलेली असते, त्यामुळे साधनेचे मोल कमी होत चालले आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तळवलकर म्हणाले, ‘संगीतामध्ये साहित्य, तंत्र, सादरीकरण हे घराण्यांचे निकष असतात. प्रत्येक घराणे वेगळे विचार देते. गुरू केवळ संगीत शिकवत नाही, तर तो विचार देतो. संगीतातून मिळणारी उर्जा हा गुरूकडून मिळालेला प्रसाद असतो. दोन बंदिशी कमी गायला मिळाल्या तरी चालतील, संगीतातून मिळणारा आनंद महत्वाचा आणि तोच पुढील पिढीला वारसा म्हणून देता येतो. संगीतात विधानाची पूर्तता म्हणजे समेवर येण्याचा क्षण असतो. धुनीच्या माध्यमातून कलाकार विधानापर्यंत पोचतो तेव्हा बंदिश जन्म घेते. बंदिश हे मूर्त तर गायकी हे अमूर्त स्वरूप असते. अमूर्त गोष्ट मूर्त स्वरूप घेते, तेव्हा कलाकार पुढील अमूर्ताचा शोध घेतो.