सुरेश वाडकर यांना यंदाचा ‘पंचमरत्न’ पुरस्कार जाहीर
By श्रीकिशन काळे | Updated: December 16, 2024 15:22 IST2024-12-16T15:21:17+5:302024-12-16T15:22:39+5:30
पुण्यातील कलावंतांच्या एका समूहातार्फे दरवर्षी बर्मन यांच्याशी संबंधित कलाकारांचा ‘पंचमरत्न’ पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो.

सुरेश वाडकर यांना यंदाचा ‘पंचमरत्न’ पुरस्कार जाहीर
पुणे : सुप्रसिद्ध संगीतकार आर. डी. बर्मन (पंचमदा) यांचे चाहते असलेल्या पुण्यातील कलावंतांच्या एका समूहा तर्फे दरवर्षी बर्मन यांच्याशी संबंधित कलाकारांचा ‘पंचमरत्न’ पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो. यंदाचा हा पुरस्कार प्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला, शनिवार दिनांक ४ जानेवारी रोजी आर. डी. बर्मन यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधत आयोजित करण्यात येत असलेल्या ‘री-डिस्कव्हरींग पंचम’ या विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. सदर कार्यक्रम स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी ६ वाजता होईल.
मानचिन्ह, पुणेरी पगडी, शाल आणि श्रीफळ असे ‘पंचमरत्न’ या पुरस्काराचे स्वरूप आहे. याआधी हा पुरस्कार कर्सी लॉर्ड, मनोहरी सिंघ (मनोहरीदा), शैलेंद्र सिंग, तौफिक कुरेशी, नितीन शंकर अशा पंचमदां सोबत काम केलेल्या अनेक कलाकारांना प्रदान करण्यात आला आहे.
दिनांक ४ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘री-डिस्कव्हरींग पंचम’ या विशेष कार्यक्रमाची संकल्पना पुण्यातील सुरज दोशी, आनंद घोगरे आणि गौरव प्रभुणे या कलाकारांची असून कार्यक्रमात व्हायोलिन सेक्शन, ब्रास सेक्शन, गिटार सेक्शन अशी विविध वाद्ये वाजवणाऱ्या सुमारे ६० हून अधिक कलाकारांचा संच रंगमंचावर असेल.