होमिओपॅथी डॉक्टरचा 'प्रताप'; परवानगी नसतानाही २२ वर्षीय तरूणाच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 06:45 PM2021-08-02T18:45:57+5:302021-08-02T19:02:56+5:30
परवानगी नसतानाही एका बावीस वर्षीय तरूणाच्या गुप्तांगावर या डॉक्टरने शस्त्रक्रिया केल्याचा प्रकार
पुणे: तो होमिओपॅथी डॉक्टर. तरीही दवाखान्याबाहेर स्वत:च्या नावासमोर जनरल फिजिशन अँड सर्जन, तसेच, स्कीन स्पेशालिस्ट अँड सेक्सालॉजिस्ट' असा बेकायदेशीरपणे फलक त्याने लावला. शस्त्रक्रिया करण्याची या पॅथीच्या डॉक्टरला कोणतीही परवानगी नसतानाही एका बावीस वर्षीय तरूणाच्या गुप्तांगावर या डॉक्टरने शस्त्रक्रिया केल्याचा प्रकार समोर आला आहे. या डॉक्टरचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश बी.पी.क्षीरसागर यांनी फेटाळला.
डॉ. रितेश शहा (रा. लोहगाव) असे त्या डॉक्टरचे नाव आहे. महापालिकेतील आरोग्य विभागातील ४८ वर्षीय वैद्यकीय अधिका-याने याबाबत विमानतळ पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टीशनर्स अँक़्ट १६१ मधील कलम ३३ आणि भादवी कलम ४२० सह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहा याने बी.एच.एम.एस. शिक्षण घेतले आहे. त्याने दवाखान्याच्या बाहेर डॉ. शहाज क्लिनिक' असा बोर्ड लावला आहे. वाघोली येथील एका तरूणाच्या गुप्तांगावर या डॉक्टरने शस्त्रक्रिया केली. त्या तरूणाला त्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याने महापालिका आरोग्य विभागाकडे याबाबतची तक्रार दिली.
डॉक्टरने तरूणाकडून शस्त्रक्रियेसाठी ४० हजार रुपये घेतले. या प्रकरणात महापालिका आरोग्य विभागाने खात्री करून पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर डॉक्टरने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. यास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. शैक्षणिक अर्हता नसतानाही सर्जन आणि फिजिशियन असल्याचे दाखवून त्याने ही शस्त्रक्रिया केली आहे. यामुळे भविष्यात पीडिताच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही घटना गंभीर स्वरूपाची आहे. सर्वसामान्यांचा डॉक्टवरील विश्वास उडेल. दाखल गुन्ह्यात वापरलेले शस्त्रक्रियेचे साहित्य जप्त करायचे आहे. त्याच्याकडील शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे जप्त करण्यासाठी त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्याची मागणी अँड. प्रमोद बोंबटकर यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
------