ससूनमध्ये विजांच्या प्रकाशात गांधीजींवर झाली होती ‘शस्त्रक्रिया’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 11:35 AM2019-10-02T11:35:27+5:302019-10-02T11:37:23+5:30
बावीस महिन्यांच्या तुरुंगातील जीवनाचा गांधीजींच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम झाला.
पुणे आणि महात्मा गांधी यांचे एक अद्वितीय असं नातं होतं. १८ मार्च १९२२ रोजी महात्मा गांधी यांना अहमदाबादच्या सत्र न्यायाधीशांनी देशद्रोहासाठी सहा वर्षांची साधी कारावासाची शिक्षा ठोठावली होती. पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या भिंतीमागे भारतीय राष्ट्राच्या मूर्त प्रतीकाला बंदिस्त करण्यात आले होते. त्यांच्यावर तुरुंगाचे मॅन्युअल कठोरपणे लागू करण्यात आले होते आणि तरीही गांधीजी तुरुंगात ‘मुक्त पक्ष्या’सारखे आनंदात वावरत होते. बावीस महिन्यांच्या तुरुंगातील जीवनाचा गांधीजींच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम झाला. १२ जानेवारी १९२४ च्या रात्री चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, राज्यकैदी गांधीजींवर कर्नल मॅडॉक यांनी पुण्याच्या ससून रुग्णालयात शस्त्रक्रिया केली होती. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान विद्युतप्रवाह खंडित झाला. चक्रीवादळातील विजांच्या प्रकाशात गांधी यांची ‘अपँडेटॉमी’ची शस्त्रक्रिया पूर्ण करावी लागली. गांधीजींनी शल्यविशारदांचे आभार मानले आणि त्यांच्यात मैत्रीचे बंध जुळले.
४ फेब्रुवारी रोजी शासनाने अनपेक्षितपणे गांधीजींच्या शिक्षेतील काही भाग कमी केला आणि गांधीजींची विनाअट मुक्तता केली. तेव्हा ‘माझ्या सुटकेमुळे मला काहीच दिलासा मिळालेला नाही,’ अशी गांधीजींची प्रतिक्रिया होती.
४ ऑगस्ट १९३३ रोजी गांधीजींना पुणे शहराच्या हद्दीत राहण्यासाठी संयमीपणा दाखविण्यास सांगण्यात आले होते. मात्र या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना एक वर्ष कठोर कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. येरवडा कारागृहात हरिजनचे काम करण्यास नकार दिल्याने त्यांनी १८ ऑगस्ट रोजी ‘आमरण’ उपोषण सुरू केले. दि. २१ ऑगस्ट रोजी गांधीजींना ससून रुग्णालयात हलविण्यात आले. गांधीजींनी प्रार्थना केली आणि संत्राचा ज्यूस पिऊन उपवास तोडला. ससूनच्या इमारतीवर ‘महात्मा गांधी स्मारक’ अशी आठवण कोरून ठेवली असल्याची माहिती ससून प्रशासनाने दिली.