आराेग्य खात्याचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! पुण्यातील आरोग्य अधिकाऱ्यांना मुंबईची हवा
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: September 9, 2023 05:11 PM2023-09-09T17:11:01+5:302023-09-09T17:11:55+5:30
अधिकाऱ्यांच्या मनसुब्यावर पडले पाणी...
पुणे : वर्षानुवर्षे पुण्यातील आराेग्य खात्याची सवय झालेल्या आराेग्य अधिकाऱ्यांना राज्याच्या आराेग्य खात्याने अचानकच मुंबईची हवा दाखवली आहे. त्यामध्ये पुण्यातील आजी-माजी आराेग्य प्रमुखांची व जिल्हा आराेग्य अधिकाऱ्यांचीही वर्णी लागली. यामध्ये एकेकाळी महत्त्वाची पदे भूषवलेल्या दिग्गज आराेग्य अधिकाऱ्यांची अशी अचानक मुंबईत ‘साईड पाेस्टिंग’वर बदली करून आराेग्य खात्याने त्यांच्यावर एक प्रकारे ‘सर्जिकल स्ट्राईक’ केल्याचे बाेलले जात आहे.
एकवेळ पुण्याचे आराेग्यप्रमुखपद भूषवलेल्या आणि अनेक महिन्यांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या डाॅ. आशिष भारती यांची बदली मुंबईतील आराेग्य सेवा मुख्यालयाच्या सहायक संचालक पदावर २८ ऑगस्टला केली. तर ५ सप्टेंबरला जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. रामचंद्र हंकारे यांची बदली मुंबईतील औद्याेगिक आराेग्य’च्या सहायक संचालक पदावर आणि आताचे पुणे शहराचे आराेग्यप्रमुख डाॅ. भगवान पवार यांची बदली मुंबईतील अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाच्या सहायक संचालक पदावर केली. या तीनही पाेस्ट ‘राष्ट्रीय आराेग्य अभियान’मधील ‘साईड पाेस्टिंग’ समजल्या जातात.
पुणे हे इतर खात्यांमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांप्रमाणेच आराेग्य अधिकाऱ्यांसाठी आवडीचे ठिकाण आहे. पुण्यात येण्यासाठी आराेग्य अधिकाऱ्यांना माेठी ‘किंमत’ माेजावी लागते. अनेक अधिकारी तर दुसरीकडे बदली झाली तरी पुण्याचा हट्ट काही साेडत नाहीत. पुणे शहर आराेग्यप्रमुख, पुणे जिल्हा आराेग्य अधिकारी, पुणे जिल्हा शल्यचिकित्सक या पदांसाठी पूर्वीपासूनच कायम स्पर्धा असते.
अलीकडच्या काळात ही पदे मिळवण्यासाठी माेठी ‘बाेली’ लागते. जाे ती पूर्ण करताे त्याला हे पदे मिळतात. पुढे पद मिळाल्यावर मग यथावकाश ‘वसूली’ ही करता येते. असे हे पदांचे साधे साेपे गणितीय सूत्र बनलेले आहे. परंतू, आराेग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आराेग्य खात्यातील अधिकाऱ्यांना प्रमाेशन देण्यासाठी या सर्वच अधिकाऱ्यांची बदली करत हळूच इंजेक्शन दिले. पण ज्यांनी पद मिळवण्यासाठी माेठी ‘बाेली’ लावली त्यांची मात्र या बदल्यांमुळे ‘गाेची’ झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
नवीन आराेग्य अधिकारी काेण?
अचानक झालेल्या बदल्यांमुळे अधिकारी अस्वस्थ झाले आहेत. काहींनी तर पुन्हा परत येण्यासाठी सूत्रे हलवली आहेत. आता हेच अधिकारी पुन्हा परत येतात की नवीन अधिकारी येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.