वधूपित्याने दिलेल्या ‘अनोख्या ’ भेटीने वऱ्हाडी मंडळींना आश्चर्याचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 08:56 PM2018-05-04T20:56:45+5:302018-05-04T20:56:45+5:30
लग्नसमारंभात दुचाकी, आलिशान मोटारी, सोन्याचे दागिने मुलीला आणि जावयांना भेट म्हणून दिल्या आहेत. परंतु, आपल्याला असणारी आवड जोपासली जावी यासाठी वधूच्या पित्याने ही अनोखी भेट दिली आहे.
तळेगाव दाभाडे : आजपर्यंत लग्न समारंभात भांडी, दुचाकी-चारचाकी गाडीसह संसारोपयोगी वस्तू दिल्या गेल्याचे आपण पाहिले किंवा ऐकले असेल. तसेच झालीच्या विधीमध्ये मातीचा रंगवलेल्या बैलांचा जोडही अनेकदा लक्ष वेधून घेतो. मात्र, एका वधूपित्याने नवरी मुलीला चक्क खरोखरचे चार बैल, एक घोडी आणि बैलगाडा आंदण म्हणून भेट दिले आहे.
लाडक्या मुलीला ही अनोखी दिलेली भेट पाहून वऱ्हाडी मंडळी थक्क झाली. ही अनोखी भेट पाहण्यासाठी केवळ वऱ्हाडी मंडळीच नाही तर तळेगाव -चाकण रस्त्याने ये-जा करणारे प्रवासी देखील येथे थांबत होते.
खेड तालुक्यातील कुरकुंडी येथील शेतकरी व बैलगाडा मालक उत्तम पडवळ यांची कन्या गौरी हिचा मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील माजी उपसरपंच व बैलगाडा मालक मोहन काळडोके यांचा मुलगा नामदेव यांच्याशी देहूफटा येथील एका कार्यालयात विवाह झाला. यावेळी नववधूच्या पित्याने आंदण म्हणून चार बैलांचा जुंपता गाडा दिला. याशिवाय घाटात बैलगाड्यापुढे धावणारी एक देखणी घोडीही दिली. अनेकांनी आपल्या मुलामुलींच्या लग्नसमारंभात दुचाकी, आलिशान मोटारी, सोन्याचे दागिने मुलीला आणि जावयांना भेट म्हणून दिल्या आहेत. परंतु, आपल्याला असणारी आवड जोपासली जावी यासाठी वधूच्या पित्याने ही अनोखी भेट दिली आहे.
खेड आणि मावळ तालुक्यात एमआयडीसीमुळे जमिनींना भाव आला आहे. यामुळे लग्नसमारंभही मोठ्या थाटामाटात पार पडत आहेत. त्यासाठी जमीनविक्रीतून आलेला पैसा मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. मात्र, या वधूपित्याने मुलीला दिलेल्या भेटीतून पशुधनाचे महत्त्व पटवून दिले आहे.
यापूर्वी वधूपित्याने आलिशान मोटारी दुचाकी भेट दिल्या आहेत. काही जणांनी तर जावयांना मानासाठी १०१ गाड्या भेट दिल्या आहेत. त्यामुळे सध्या लग्नसमारंभात कोणती वस्तू भेट दिली जाते याबाबत वऱ्हाडींमध्ये उत्सुकता असते. मात्र, ही अनोखी भेट पाहून उपस्थितांना सुखद धक्काच बसला.