आश्चर्य ! 85 दिवस कोमामध्ये राहिल्यानंतर महिलेने दिला गोंडस मुलीला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 04:41 PM2017-09-12T16:41:03+5:302017-09-12T16:41:03+5:30
जवळपास 85 दिवस कोमामध्ये राहिल्यानंतर एका गर्भवती महिलेला आणि तिच्या बाळाला सुखरुप वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळालं आहे. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये या महिलेवर उपचार सुरु होते.
पुणे, दि. 12 - जवळपास 85 दिवस कोमामध्ये राहिल्यानंतर एका गर्भवती महिलेला आणि तिच्या बाळाला सुखरुप वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळालं आहे. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये या महिलेवर उपचार सुरु होते. मध्यप्रदेशातील बुरहानपूर येथे राहणारी ही महिला 20 मार्चपासून रुग्णालयात दाखल होती. अत्यंत काळजीपूर्वक आणि सावधानतेने तिच्यावर उपचार सुरु होते. इतके दिवस कोमात असल्याने नातेवाईकांनी सर्व आशा सोडून दिल्या होत्या. मात्र अखेर डॉक्टरांनी प्रयत्नांची बाजी लावत महिलेला वाचवलं आहे. यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांचं कौतूक करत पंतप्रधान मोदी आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. डॉक्टरांनी ही माहिती मिळताच, त्यांनी उपचारामधील खर्चात कपात केली आहे.
गेल्या आठ वर्षांपासून प्रगती डायबेटिजने त्रस्त आहेत. 5 मार्च रोजी साडे तीन महिन्यांची गर्भवती असताना प्रगती यांना बेशुद्द अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती सुधारत नसल्याने नातेवाईकांनी रुबी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. तेथील न्यूरोलॉजिस्ट डॉ रुस्तम वाडिया यांनी त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली. 20 मार्चपासून डॉ रुस्तम आणि त्यांच्या टीमने उपचारास सुरुवात केली. यानंतर प्रसूतीपुर्व उपचारासाठी स्त्रीरोग तज्ञ सुनीता तेंदुलवाडकर यांच्या देखरेखेखाली त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले.
प्रगती 17 आठवड्यांची गर्भवती असताना डॉक्टरांनी उपचारासाठी पुर्ण प्लान तयार केला होता. डाएटपासून ते साखरेचं प्रमाण नियंत्रित रहावं यासाठी सावधानतेने उपचाराची पद्धत आखण्यात आली. यानंतर परिणामही समोर येऊ लागले. डॉ सुनीता यांनी सांगितलं की, 'हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर जवळपास 85 दिवसानंतर प्रगती पहिल्यांदा बोलली. हळूहळू तिची प्रकृती सुधारु लागली'.
प्रगती जवळपास 132 दिवस रुग्णालयात दाखल होती. सुरुवातीला 22 दिवस अतीदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. नंतर प्रकृतीत सुधार झाल्यानंतर त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. डॉ सुनीता यांनी माहिती दिली आहे की, 'प्रगती यांनी जुलै महिन्याच्या शेवटी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. आई आणि नवजात बाळ सुरक्षित राहावं आणि त्यांना कशाचीही लागण होऊ नये यासाठी आमचा प्रयत्न सुरु होता. आई आणि बाळाला वाचवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. हे आमच्या मेहनतीचं फळ आहे'.