११ वर्षीय सिद्धेशच्या योगसिद्धीमुळे सारेच थक्क; शासनाने सहकार्य अन् मार्गदर्शन करण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 11:11 AM2021-01-17T11:11:35+5:302021-01-17T11:12:29+5:30
सिध्देश विठ्ठल कडू हा ११ वर्षांचा मुलगा या लहान वयातच अत्यंत कठीणातील कठीण समजली जाणारी योगासने सहजतेने करतो.
धनकवडी : काही लोक प्रयत्नाने सिद्ध बनतात, तर काही लोक जन्मतः च काही सिद्धी घेऊन जन्माला येतात ; याचे उत्तम उदाहरण म्हणजे कुमार सिद्धेश विठ्ठल कडू होय. कुमार सिद्धेश हा केवळ ११ वर्षांचा मुलगा जी योगासने करतो ती भल्याभल्यांना थक्क करणारी आहेत.'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात', ही मराठी भाषेतील म्हण किती यथार्थ आहे, यांचा प्रत्यय धनकवडी चव्हाणनगरमधील कुमार सिद्धेशची योगासने पाहिल्यानंतर येतो.
सिध्देश विठ्ठल कडू हा ११ वर्षांचा मुलगा या लहान वयातच अत्यंत कठीणातील कठीण समजली जाणारी योगासने सहजतेने करतो. कुमार सिद्धेश धनकवडी येथील बालविकास मंदिर या शाळेमध्ये शिकतो. वयाच्या ६ व्या वर्षांपासून तो सराव करत आहे. तो मयुरासन, वृश्चिकासन, चक्रासन यासारखी असंख्य आणि अत्यंत कठीण समजली जाणारी योगासने लिलया करतो. त्याच्या योगासनांची अनेक ठिकाणी प्रात्याक्षिके झाली असून त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे.
परंतु, वय लहान असल्यामुळे त्याला अद्याप कोणताही पुरस्कार मिळालेला नाही. यासंदर्भात सिद्धेश चे वडील योग शिक्षक व शिवशक्ती क्रीडा प्रतिष्ठाणचे संस्थापक ह. भ. प.विठ्ठल कृष्णा कडू म्हणाले, "जिल्हा परिषदेच्या नियमानुसार कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेण्याचा निकष हा इयत्ता ६ वी आणि स्पर्धेकाचे वय वर्षे ११ वर्षे असावे लागते. कोरोनामुळे त्याची मागील वर्षाची स्पर्धा झाली नाही. त्यामुळे सिद्धेशला स्पर्धेपासून वंचित रहावे लागले.
सिद्धेश वडील टेम्पो चालक असून, कराटे मध्ये ब्लॅकबेट मिळाविला आहे. तसेच ते योगासने सुद्धा करतात. त्यामुळेच वडीलांचे गुण सिद्धेश मध्ये असल्याने सिद्धेश उत्तम योगपटू बनला आहे. त्याला जर सर्वांची उत्तम मदत व सहकार्य लाभले, तर तो योगासने या क्रिडा प्रकारामध्ये राष्ट्रीय पातळीवरील कामगिरी करू शकतो. तरी त्याच्या या कौशल्याची दखल शासन, प्रशासन व क्रिडा मंत्रालयाने घेऊन त्याला योग्य ते सहकार्य व मार्गदर्शन करावे."
सिद्धेशने वयाच्या आठव्या वर्षी पन्हाळागड ते पावनखिंड अंतर पाया चालत बावीस तासात पुर्ण केले असून महाराष्ट्रातील सर्वात खडतर लिंगाणा किल्ला सर करत किल्ल्यावर अवघड आसनाचे प्रात्यक्षिक केली. आठ वर्षाच्या सिद्धेशने सर्वात उंच ठिकाणी केलेली आसने पाहून गिर्यारोहक थक्क झाले.