सिंहगडाचा अवघड पश्चिमकडा सर करुन ३५० युवकांची तान्हाजींना अनोखी मानवंदना 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 09:39 PM2020-02-15T21:39:59+5:302020-02-15T21:48:15+5:30

हर..हर..महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करत सिंहगडाचा अवघड पश्चिमकडा सर..

Surrounding the western part of Sinhagad, 350 youths gave Tanhaji to salute | सिंहगडाचा अवघड पश्चिमकडा सर करुन ३५० युवकांची तान्हाजींना अनोखी मानवंदना 

सिंहगडाचा अवघड पश्चिमकडा सर करुन ३५० युवकांची तान्हाजींना अनोखी मानवंदना 

Next
ठळक मुद्दे३५० व्या पुण्यतिथीनिमित्त इतिहास प्रेमी मंडळाचा पुढाकारमावळ्यांच्या वेशात कडा सर करून दैदिप्यमान युद्धाच्या आठवणींना दिला उजाळा

पुणे :  हर..हर..महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करत जवळपास ३५० तरूण युवकांनी सिंहगडाचा अवघड पश्चिमकडा सर करून तान्हाजी मालुसरे यांना अभिवादन करत अनोखी मानवंदना दिली. निमित्त होते तान्हाजी मालुसरे यांच्या ३५० पुण्यतिथीचे. मुलांनी मावळ्यांच्या वेशात कडा सर करून दैदिप्यमान युद्धाच्या आठवणींना ऊजाळा दिला. 
रणांगणावर रक्त सांडले, रणी धुरंदर वीर स्मरा... दुर्गम गड गाजविला रात्री, नरवीर केसरी घ्या मुजरा... अशा काव्यपक्तींमधून आणि जय भवानी, जय शिवाजी च्या जयघोषात ३५० युवक-युवतींनी  उत्साह दाखवत पुन्हा एकदा सिंहगडावर चढाई केली.  मराठा इतिहासातील एक देदिप्यमान पर्व असलेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांनी गाजविलेल्या पराक्रमाला महाराष्ट्रातील तरुणाईने प्रत्यक्ष गडावर जाऊन आगळीवेगळी मानवंदना दिली.  सुमारे ४० फुटी कडा दोराच्या सहाय्याने सर करत मराठयांच्या शौर्याचा सुवर्णकाळ पुन्हा एकदा अनुभवला.
 इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ३५० व्या पुण्यतिथीनिमित्त आणि सिंहगड सर केल्याच्या घटनेला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने या अनोख्या मानवंदना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  या प्रसंगी गडावर झालेल्या कार्यक्रमाला सर्जिकल स्ट्राईकचे रणनीतीकार लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त), ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.   
राजेंद्र निंभोरकर म्हणाले, तानाजी मालुसरे यांनी गडावर केलेल्या चढाईप्रमाणे लष्करातर्फे देखील शत्रूवर चढाई केली जाते आणि ९० टक्के यश यामध्ये असते, असा अनुभव आहे. आपण इतिहास विसरलो, तर भूगोल निश्चित रहात नाही. पूर्वजांनी गाजविलेला इतिहास आपल्याला माहिती हवा, त्यातून तरुणांना प्रोत्साहन मिळेल.  
पांडुरंग बलकवडे म्हणाले, ज्या देशातील व्यक्ती स्वत:च्या घरातील कार्य सोडून देशासाठी बाहेर पडतो, तो देश नक्कीच पुढे जातो. आपला संघर्ष राष्ट्रासाठी आहे, देशभक्तीचा विचार पुढे गेला पाहिजे, ही भावना शिवरायांनी मावळ्यांमध्ये रुजविली. राष्ट्रभक्ती सोबतच संस्कृतीभक्ती व समाजभक्ती देखील त्यांनी रुजविली.  
..................
ज्याप्रमाणे तानाजी मालुसरेंनी ३५० वर्षांपूर्वी हा किल्ला ताब्यात घेतला. त्या कडयावरुन आम्ही दोरावर गाठी बांधून आलो, तरी अवघड गेले. त्याकाळी त्यांनी कसे युद्ध केले असेल, याची कल्पना आपण करु शकत नाही. मावळी पोशाखात आम्ही सहभागी झालो होतो, त्यामुळे आम्ही शिवकाल पुन्हा एकदा अनुभवला. - सौरभ जगताप, सहभागी युवक.
........
नरवीर तानाजी मालुसरे यांनी सिंहगड किल्ला जिंकून घेण्याच्या पराक्रमाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. सिंहगडासारखा बळकट दुर्ग आणि उदयभानू सारखा कडवा मोगल किल्लेदार असताना गड जिंकणे सोपे नव्हते़ पण अतुलनीय धाडस, गनिमी कावा तंत्राचा अचूक वापर, स्वराज्यावरील अभंग निष्ठा, गडाचा सर्वांगिण अभ्यास या गुणांमुळे मराठ्यांनी हा गड जिंकून घेतला. ती रात्र होती १६७० सालच्या माघ वद्य नवमीची. त्यामुळे त्यांच्या शौर्याला आम्ही केवळ पूजा, आरती व घोषणांनी नव्हे, तर प्रत्यक्ष तो अनुभव घेऊन मानवंदना दिली. - मोहन शेटे,  अध्यक्ष, इतिहास प्रेमी मंडळ. 
..................

Web Title: Surrounding the western part of Sinhagad, 350 youths gave Tanhaji to salute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.