सूर छेडिले, नदीकाठी, नदीसाठी; संगीतमय कार्यक्रमातून ‘नदी वाचवा’चा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 03:49 AM2019-03-11T03:49:18+5:302019-03-11T03:49:30+5:30
भारूडे, गीते, काव्याने दुमदुमला परिसर
पुणे : नदी किनारी छान गाणी, कविता, गझल, कथा ऐकताना सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटात, सूर्यकिरणांच्या कोवळ्या प्रकाशझोतात, पालापाचोळ्याच्या सान्निध्यात, वृक्षराजीच्या सावलीत पुणेकर रंगून गेले. नदी विषयाच्या आपुलकीच्या जाणिवा या मैफलीने अजून गडद केल्या. लहानथोरापासून सर्वांनी येथे नदी संवर्धनाचा ध्यास मनी रूजवला. संगीताच्या लहरीने येथील परिसर दुमदुमून गेला. नदी संवर्धनासाठी पहिल्यांदाच एक अनोखा संगीतमय कार्यक्रम नदीकाठी नदीसाठी जीवितनदी संस्थेकडून आयोजित करण्यात आला होता.
संथ वाहते कृष्णामाई, सांज ये गोकुळी सावळी सावळी, माझे जीवनगाणे, सिखो ना नैनो की भाषा, ओ नदी आ नदी ओ नदी नदीया आदी गाणी सादर झाली. हा मैफलीचा कार्यक्रम चंद्रकांत निगडे, अमेय वरदे, ओमकार खाडीलकर, संबोधी सोनवणे, हृषीकेश डोईफोडे, मैथिली डोईफोडे, मोहित, शुभा कुलकर्णी, मृणाल वैद्य, सागर कुलकर्णी, चंदूलाल तांबोळी यांनी सादर केला. शैलजा देशपांडे यांनी सर्वांची ओळख करून दिली. हा कार्यक्रम औंध येथील राम नदी आणि मुळा नदीच्या संगमाजवळ घेण्यात आला.
नदी म्हणजे फक्त वाहणारे पाणी नव्हे. तिच्यापलीकडे जाऊन तिला समजून घेतले पाहिजे. ‘झाले गेले गंगेला मिळाले’, अशी एक म्हण आहे. आपणच आपल्या गोष्टीची विल्हेवाट लावावी. तिच्यात सर्व आपण घाण, कचरा टाकतो. खरं तर आपलं नातं नदीशी राहिलेले नाही. तिचं आणि आपलं नातंच फुललेले नाही. त्यामुळे तिच्याबद्दल नागरिकांमध्ये प्रेम राहिलेले नाही. मंगेश पाडगावकर यांचे ‘या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे’ हे गीत सादर झाले आणि मातीशी काय नातं असते ते उलगडलं. नदी तृष्णा तृप्तीचे कार्य करीत आली आहे. पण आता तिच्या जागी धरणे आली आहेत. या धरणांमुळेच आपण पाणी पितो, असेच अनेकांना वाटते, अशी आजची विचार करण्याची पद्धत उलगडली.
‘विंचू चावला’तून नदी स्वच्छतेचा संदेश
अगंगं विंचू चावला हे विडंबनात्मक काव्य सादर केले. नदीला जणू काही विषारी केमिकलचा विंचू चावला आहे. त्यामुळे तिची अवस्था दयनीय झाली आहे. मलवाहिनी दररोज नदीला नांगी मारत आहे. दररोज त्यातून किती तरी केमिकल नदीत जात आहे. परिणामी नदी नाल्यासारखी विपन्नावस्थेत आहे. यावर एकच उतारा आहे. घरातून जाणारे केमिकल बंद करणे. नैसर्गिक जीवनशैली अंगीकारणे. त्यातूनच घरबसल्या नदी स्वच्छ होऊ शकते, असा संदेश या ‘विंचू चावला’ काव्यातून देण्यात आला.
शैलजा देशपांडे म्हणाल्या, आपली फुफ्फुसे आपणच संरक्षित करणे आवश्यक आहे. जंगल हे आहे तसे ठेवायचे असेल तर त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विकासासाठी या जंगलाचे नुकसान नकोय. भ्रामक विकासाच्या कल्पनेमागे न जाता शाश्वत विकासाकडे जायला हवे.
नदीत दूषित पाण्याचा थेंब नको
नदी संवर्धनाचे काम करणारे कार्यकर्ते अनिल गायकवाड म्हणाले, ‘‘सध्या महापालिकेत विकासासाठी कोटीच्या कोटी उड्डाणांचे नियोजन करण्यात येते. तेव्हा नदीकडेही थोडेसे पाहिले पाहिजे. शंभर वर्षापूर्वीची नदी हवी आहे. पूर्वी कुठलेही त्यात बांधकाम नव्हते. राम नदीमध्ये दहा किलोमीटरचा भाग पालिका हद्दीत येतो. त्यात कुठलाही दूषित पाण्याचा थेंब जाऊ नये, यासाठी लोकप्रतिनिधीने प्रयत्न केले पाहिजे.