मालमत्तेचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण
By Admin | Published: April 27, 2017 04:44 AM2017-04-27T04:44:47+5:302017-04-27T04:44:47+5:30
दौंड नगर परिषद हद्दीतील मालमत्तेचे सर्वेक्षण ड्रोनद्वारे करण्याचा महाराष्ट्रातून पहिला मान दौंड नगर परिषदेला मिळाला आहे.
दौंड : दौंड नगर परिषद हद्दीतील मालमत्तेचे सर्वेक्षण ड्रोनद्वारे करण्याचा महाराष्ट्रातून पहिला मान दौंड नगर परिषदेला मिळाला आहे. ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचा पहिला टप्पा झाला असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी दिली.
या कामाची पाहणी करण्याकरिता नगराध्यक्षा शीतल कटारिया यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी येथील राज्य राखीव पोलीस बल गटाच्या परिसरात गेले होते. शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण व माहितीचे संकलन करून शहराचे ‘जीआयएस’ आधारित मालमत्ता सर्वेक्षण व कर आकारणी याचबरोबरीने पुढील नियोजन करण्याकरिता अद्ययावत उच्च दर्जाचे छायाचित्र आवश्यक असते. त्यानुसार हे छायाचित्र मिळविण्यासाठी मालमत्ता सर्वेक्षण, करमूल्यांकन करण्याचे काम करण्याकरिता नगर परिषदेद्वारे अमरावती येथील एका संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सर्वेक्षणामध्ये काही माहिती द्यावयाची राहून गेल्याचे निदर्शनास आल्यास अशा नागरिकांनी तातडीने दौंड नगर परिषदेकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वेक्षणाचे काम यशस्वीरित्या करण्याकरिता नगर परिषदेचे नगराध्यक्षा शीतल कटारिया, उपनगराध्यक्षा हेमलता परदेशी, मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात, सर्व नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी आदींचे सहकार्य मिळाले.