पुरातत्त्व विभागाकडून जेजुरीगडाची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 12:15 AM2018-08-30T00:15:36+5:302018-08-30T00:16:08+5:30
सूचना पाठवल्या : उपाययोजनांची प्रतीक्षा
जेजुरी : जेजुरीगडाची पुरातत्त्व विभागाकडून मंगळवारी पाहणी करण्यात आली असून पाहणीनंतर मार्तंड देव संस्थानला सूचना देण्यात आल्या आहेत. जेजुरीचे कुलदैवत खंडेरायाच्या गडकोट, मंदिर आवार व पायरीमार्गावरील दीपमाळा, वेशी यांच्या डागडुजी-दुरुस्तीची गरज या आशयाचे वृत्त दै. ‘लोकमत’ने नुकतेच प्रसिद्ध केले होते.
या वृत्ताची दखल घेऊन पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाणे, वास्तूजतन सहायक रामेश्वर निपाणे यांनी जेजुरी येथे येऊन पायरीमार्ग, मंदिर, गडकोट आवार, दीपमाळा, वेशी, तटबंदी यांची पाहणी केली होती. त्यानंतर एका पत्राद्वारे देवसंस्थान समितीला सुमारे ११ सूचना करण्यात आल्या आहेत. खंडोबा गडकोट मंदिर राज्यसंरक्षित स्मारकाच्या जतन दुरुस्तीबाबत वास्तुविशारदतज्ज्ञ नेमण्यात येऊन अहवाल /आराखडा, संरचनात्मक परीक्षण अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्याचा खर्च देवसंस्थानने करावयाचा आहे.
वास्तूचे नुकसान झाले आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याला मार्बल लावण्यात आल्याने आतील भागात आर्द्रता वाढत आहे. त्यामुळे मूर्ती व मंदिराचे आयुष्यमान कमी होण्याची शक्यता आहे. मंदिराच्या तटबंदीतील ओवरी अनेक वर्षांपासून बंद करून कार्यालय, स्नानगृह, स्वयंपाकगृह खोल्या, निर्माण केल्याने व यात वापरणारे पाणी भिंतीत मुरल्याने भिंत फुगलेली आहे. काही दगड कोसळण्याची शक्यता आहे. पायरीमार्ग व गडकोटाच्या बाजूला अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमणे करून दीपमाळा, वेशींना ताडपत्र्यांच्या प्लॅस्टिक कागदांच्या दोºया बांधल्या आहेत. त्यामुळे हवा व पाणी यांच्या दबावाने दीपमाळा, वेशी, पुरातन वास्तूंना धोका निर्माण होत आहे. ते तत्काळ काढण्यात यावेत.
मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भंडारा उधळला जातो. तो वेळच्यावेळी स्वच्छ करावा. धोकादायक ठिकाणी सूचनाफलक लावण्यासह आदींसह सुमारे ११ सूचना करण्यात आल्या आहेत.
मंदिर, गडकोट, दीपमाळा, पायरीमार्ग, नगारखाना, प्रवेशद्वार, विविध मंदिरे, कमानी, दगडी शिल्पे यांची पुरातत्त्वशास्त्र संकेतानुसार जतन दुरुस्ती करणे आवश्यक आहे. बृहद्आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. विकासकामांचे ढोबळ अंदाजपत्रक तयार करण्यात येईल.