समान पाणी योजनेचे सर्वेक्षण अखेर सुरू; जलवाहिन्या बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 02:41 AM2018-06-03T02:41:29+5:302018-06-03T02:41:29+5:30
बहुचर्चित समान पाणी योजनेच्या (२४ तास पाणी) प्रत्यक्ष कामाला नाही, पण किमान जुन्या नळजोडांच्या सर्वेक्षणाला तरी महापालिकेने सुरुवात केली आहे. शहरातील प्रत्येक नळजोड यात नोंद करून घेतला जाणार असून, त्यासाठी एका खासगी कंपनीला काम देण्यात आले आहे.
पुणे : बहुचर्चित समान पाणी योजनेच्या (२४ तास पाणी) प्रत्यक्ष कामाला नाही, पण किमान जुन्या नळजोडांच्या सर्वेक्षणाला तरी महापालिकेने सुरुवात केली आहे. शहरातील प्रत्येक नळजोड यात नोंद करून घेतला जाणार असून, त्यासाठी एका खासगी कंपनीला काम देण्यात आले आहे. नागरिकांनी या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ते विचारतील ती माहिती द्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
गेल्या सलग दीड-दोन वर्षांपासून समान पाणी योजनेची चर्चा शहरात सुरू आहे. या एका योजनेसाठी महापालिकेने तब्बल २०० कोटी रुपयांचे कर्जरोखे काढले आहेत. त्याचे दरमहा व्याज महापालिकेला जमा करावे लागत आहे. त्याचे त्यानंतर योजनेच्या निविदांवरून वाद झाले. फेरनिविदा काढली तर त्यातही अनेक आरोप झाले. आता निविदा मंजूर झाल्या आहेत, मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवातच झालेली नाही. त्यामुळे आधीच टीकेचे लक्ष्य झालेल्या या योजनेकडे आता साशंकतने पाहिले जाऊ लागले आहे. महापालिकेच्या वतीने कंपन्यांचे सर्व्हेअर आणि अन्य अधिकारी, कर्मचाºयांना सर्वेक्षण करण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे सही-शिक्क्यासह ओळखपत्र देण्यात आले आहे. त्यांचे ओळखपत्र पाहून त्यांना ते विचारतील ती सर्व माहिती द्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. हे काम किमान पावसाळा पूर्ण होईपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. शहराचा आराखडा तयार करून त्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे आता दिसते आहे.
- या योजनेत शहरातील सर्व जुन्या पाईपलाईन बदलण्यात येतील. सुमारे १ हजार ८०० किलोमीटर अंतराच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्याचे सर्वेक्षण करणे गरजेचे असल्यामुळे आता ते काम करण्यात येईल. शहरातील प्रत्येक घरात जाऊन खासगी कंपनीचे कर्मचारी नळजोडधारकाचे नाव, दूरध्वनी क्रमांक, मिळकतकर क्रमांक, कुटुंबातील सदस्य संख्या, मिळकतीचा प्रकार, जीपीएस अक्षांश-रेखांश अशा स्वरूपाच्या नोंदी हे कर्मचारी करणार आहेत. त्यासाठी ते नागरिकांकडे विचारणा करतील.