सणसरला मुंबई- हैदराबाद बुलेट ट्रेनमार्गाचे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:11 AM2021-05-07T04:11:25+5:302021-05-07T04:11:25+5:30
सणसर : केंद्र शासनाच्या मुंबई-हैदराबाद हाय स्पीड बुलेट ट्रेनच्या मार्गाच्या सर्वेक्षणाला गुरुवारी सणसर येथून सुरुवात झाली. मुंबई-पुणे-सोलापूर-हैदराबाद अशा ...
सणसर : केंद्र शासनाच्या मुंबई-हैदराबाद हाय स्पीड बुलेट ट्रेनच्या मार्गाच्या सर्वेक्षणाला गुरुवारी सणसर येथून सुरुवात झाली. मुंबई-पुणे-सोलापूर-हैदराबाद अशा पद्धतीचा हाय स्पीड बुलेट ट्रेनचा मार्ग इंदापूर तालुक्यातून जाणार हेच यातून समोर येत आहे.
सणसर येथे हवाई सर्वेक्षणासाठी पिलरचे काम करण्यात आले होते. गुरुवारी प्रत्यक्षात सर्वेक्षणाला सुरुवात करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. केंद्र सरकार, गुजरात व महाराष्ट्र शासन यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. या सर्वेक्षणाचे काम पुण्याच्या मोनार्च सर्वेयर अँड इंजिनिअरिंग कन्सल्टंट आणि आयआयसी टेक्नॉलॉजी या कंपन्यांना हे काम देण्यात आलेले आहे. हे काम प्राधान्याने करून मे महिना अखेर, मान्सून राज्यात दाखल होण्याआधी पूर्ण करण्याचे आदेश केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाने या सर्व्हे करणाऱ्या कंपनीस दिले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी पालखी महामार्गाच्या रुंदीकरण व भूसंपादनाचा फटका बसलेला असतानाच आता या हाय स्पीड बुलेट ट्रेनचे भूसंपादन झाल्यास शेतकऱ्यास नाहक त्रास सोसावा लागणार आहे. शेतकरी या बुलेट ट्रेनच्या मार्गाविषयी व भूसंपादनविषयी मात्र बेजार होणार, अशी चर्चा सध्या शेतकऱ्यांमधून चर्चिली जात आहे. हे सर्वेक्षण चालू असताना जाचक वस्तीचे माजी उपसरपंच विक्रमसिंह निंबाळकर, उपसरपंच प्रकाश नेवसे, दीपक सर निंबाळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.