पर्यटन व्यावसायिकांचे सर्वेक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:17 AM2021-05-05T04:17:57+5:302021-05-05T04:17:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दरवर्षी लाखो पर्यटक देशविदेशातून महाराष्ट्राला भेट देतात. मात्र कोरोना, लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे पर्यटन व्यवसाय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दरवर्षी लाखो पर्यटक देशविदेशातून महाराष्ट्राला भेट देतात. मात्र कोरोना, लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे पर्यटन व्यवसाय अडचणीत सापडला असून, या क्षेत्राची राज्यातील दरमहा होणारी अंदाजे दीड ते दोन हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि पर्यटन संचालनालय यांच्यातर्फे पर्यटन व्यवसायाशी संबंधित घटकांच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. पर्यटन व्यवसाय सावरण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवता येतील, नुकसान भरून काढण्यासाठी काय करावे लागेल, पर्यटन धोरण काय ठरवावे लागेल यासाठी हा सर्व्हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
संचारबंदी आणि निबंर्धांमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. अशा स्थितीत पर्यटन व्यवसायास किती लोक जोडले आहेत, त्यापैकी कोणाचे किती नुकसान झाले, असा आजवर सर्व्हे कधीही झालेला नाही. त्यामुळे या व्यवसायाला सावरण्यासाठी उपाययोजनाच आखता आलेल्या नव्हत्या. त्यामुळे पर्यटनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि पर्यटन संचालनालय यांनी सर्वेक्षण करण्याकरिता पावले उचलली आहेत. या सर्वेक्षणात हॉटेल व्यवसायिक, रेस्टॉरंट, यात्री निवास, निवास न्याहारी योजना, कृषी पर्यटन केंद्र, निसर्ग पर्यटन केंद्र, वॉटर पार्क, टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या एजंट, वाहतूकदार कंपन्या, बोटिंग क्लब, पर्यटन खेळ सुविधा पुरवठादार, गाईड, स्टॉल्सधारक हे प्रमुख घटक केंद्रस्थानी असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे दिली आहे.
--------------------
पर्यटन व्यवसाय सावरण्यासाठी हा ऑनलाइन सर्व्हे केला जात आहे. त्याची लिंक एमटीडीसीने पर्यटक, त्यावर अवलंबून असलेला व्यवसाय, पर्यटकांची वार्षिक संख्या, त्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, नुकसानीचे स्वरूप, कामगार संख्या आणि त्यावर अवलंबून असलेले घटक याला अनुसरून सर्वेक्षण केले जात आहे.
- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पुणे
----------------------------------