जादा पाणी वापरासाठी आता नोटीसा नव्हे सर्वेक्षण करणार
By राजू हिंगे | Published: November 26, 2023 02:36 PM2023-11-26T14:36:02+5:302023-11-26T14:37:12+5:30
शहरात समान पाणी पुरवठा योजनचे काम सुरू
पुणे : समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महापालिकेने निवासी सोसायट्या, तसेच स्वतंत्र घरांना पाण्याचे मीटर बसवले आहेत. ज्या भागातील मिळकतींचा पाणीवापर जास्त आहे. त्या मिळकतींना पालिका नोटीस देत होती. त्यामुळे नागरिक पाणी मीटर बसविण्यास विरोध करत आहे. त्यामुळे आता ज्या ठिकाणी पाणी मीटर बसविले आहेत. त्या ठिकाणी जादी पाणी वापर करणाऱ्याचे तातडीने सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यात जादा पाणी वापराची कारणे देउन अहवाल सादर केला जाणार आहे.
शहरात समान पाणी पुरवठा योजनचे काम सुरू आहे. या योजनेअतंर्गत शहरात सुमारे २ लाख ८० हजार पाणीमीटर बसवण्यात येणार असून, आतापर्यंत सुमारे १ लाख ३९ हजार पाणी मीटर बसविण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत शहरात नव्याने १ हजार ६०० किलोमीटरच्या जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. पाणी पुरवठ्यासाठी शहराचे स्वतंत्र झोन तयार करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत प्रत्येक झोनमधील टाकीत सोडले जाणारे पाणी तसेच प्रत्यक्षात मीटरमधून नागरिकांच्या घरापर्यंत जाणाऱ्या पाण्याचा हिशेब ठेवला जात आहे. त्यामुळे जलवाहिनीत होणारी पाण्याची गळती तसेच मीटरमधून घेण्यात येणारे पाणी याची तपासणी केली जात आहे. त्यामुळे कोणत्या मिळकतींमधे किती पाणी दिले, कोणत्या मीटरमध्ये जादा पाणी घेतले गेले, कोणत्या मीटरमधून अचानक पाणी घेणे कमी करण्यात आले, ही माहिती एका क्लिकवर समोर येत आहे. या मीटर ऑडिटमध्ये अनेक मिळकतींमधील पाणी वापराची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेने जादा वापराबददल ४ हजार जणांना नोटीस बजावली आहे. पण नोटीस बजावल्यामुळे नागरिक पाणी मीटर बसविण्यास विरोध करत आहे. त्यामुळे आता पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने एक पाउल मागे घेतले आहे.
आता ज्या भागातील मिळकतींचा पाणीवापर जास्त आहे, तेथे पाणी पुरवठा कनिष्ठ अभियंत्यानी तातडीने सर्वेक्षण करायचे आहे. पाणी वापर जास्त असल्याची कारणे शोधायची असून, संबंधितांना पाणी कमी वापरण्याच्या सूचना द्यायच्या आहेत. या सर्वेक्षणात पाण्याच्या टाकीची गळती, संबंधित मिळकतींमधील नागरिकांची संख्या, जलवाहिनीची गळती अशा बाबींचे सर्वेक्षण करून जादा पाणी वापराची कारणे असणारा अहवाल सादर करायचा आहे असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.