सूर्यनारायण तापले! पुण्यात सकाळपासूनच अंगाची लाहीलाही, दुपारी घराबाहेर पडू नका...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 10:45 AM2023-04-21T10:45:56+5:302023-04-21T10:46:16+5:30
उन्हात फिरताना अनेक जणांना चक्कर येत असल्याने शक्यतो दुपारी घराबाहेर पडूच नये
पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून किमान व कमाल तापमानात प्रचंड वाढ होत आहे. पूर्वी पुण्यात उन्हाळ्यात किमान तापमान २० अंशांच्या आसपास असायचे; परंतु, आता हे तापमान २५च्याही पुढे जात आहे. अजून संपूर्ण मे महिना यायचा आहे, तरीही सकाळपासूनच प्रचंड उकाडा आता जाणवत आहे. उष्माघाताचा परिणाम नागरिकांवर होऊ लागला आहे. त्यामुळे शक्यतो दुपारी घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामानशास्त्र विभागाकडून करण्यात येत आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून शहरातील ठिकठिकाणचे तापमान नोंदविले जात आहे. त्यासाठी खास स्टेशन्स उभारली आहेत. शहरात तापमान डिस्प्ले करणारी १६४ ठिकाणे आहेत. यामध्ये महापालिका, आयएमडी आणि जिल्हा प्रशासनाचा समावेश आहे. पुणे शहरासह राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात हवामानशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी झाली. त्यामध्ये या लाटेविषयीची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे.
पुणे शहरातील उन्हाळा दिवसेंदिवस खूप तीव्र होत आहे. मध्यवर्ती तर तापमानाचा पारा चाळिशीच्या पार गेला आहे. कोरेगाव पार्क, वडगाव शेरी, मगरपट्टा या ठिकाणी चाळीस तापमान नोंदवले जात आहे. खरे तर कोरेगाव पार्कला माेठ्या प्रमाणात झाडी आहे. तरी देखील तेथे तापमान अधिक नोंदवले जात आहे. बुधवारी कोरेगाव पार्क येथे ४२.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तापमानाचा पारा अधिक वर जाणार असून, उकाडा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सकाळी किमान ३० तर बारा वाजता ३६ अंशांवर
शहरात गुरुवारी सकाळी ९ वाजता किमान तापमान मगरपट्टाला ३० तर शिवाजीनगरला २७.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्यानंतर १२ वाजता हेच तापमान वाढून शिवाजीनगरला ३५ तर मगरपट्टा येथे ३६.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. यावरून तीन तासांमध्ये झपाट्याने तापमान वाढल्याचे दिसून येत आहे.
उष्माघाताचा बसेल फटका
सकाळपासूनच उकाडा अधिक जाणवत आहे. दुपारी उन्हात फिरताना अनेक जणांना चक्कर येत आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना शक्यतो पांढरे कपडे घालावेत. महत्त्वाचे काम नसेल तर दुपारी घराबाहेर पडूच नये, असे आवाहन हवामानशास्त्र विभागाने केले आहे.
वीज बंदमुळे उकाड्याने नागरिक त्रस्त
गुरुवारी शहरात अनेक ठिकाणी महावितरणकडून वीजपुरवठा बंद केला होता. त्यामुळे घरात बसलेल्यांच्या अंगाची लाहीलाही झाली. घामाच्या धारा असह्य झाल्या. किमान उन्हाळ्यात तरी वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.