सूर्यनारायणाने घेतले भुलेश्वराचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:06 AM2021-03-30T04:06:18+5:302021-03-30T04:06:18+5:30
भुलेश्वर : संपूर्ण राज्यात एक जागृत देवस्थान म्हणून नावारूपाला आलेल्या पुणे जिल्ह्यात शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या माळशिरस ...
भुलेश्वर : संपूर्ण राज्यात एक जागृत देवस्थान म्हणून नावारूपाला आलेल्या पुणे जिल्ह्यात शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या माळशिरस येथील श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिरात आज सूर्यनारायणाने मुख्य गाभाऱ्यातील शिवलिंगापर्यंत जाऊन तब्बल बारा मिनिटे सोनेरी अभिषेक घातला. मात्र, हा योग अनेक भाविकांना पाहता आला नाही.
भुलेश्वर मंदिराची रचना इतकी नियोजन बद्ध आहे की, आज भुलेश्वर मंदिराच्या नगारखाण्यापासून सकाळी सहा वाजून एक्कावन्न मिनिटांनी सूर्यकिरणांनी शंभर फुटांपेक्षा अधिक अंतर असलेल्या मुख्य मंदिरात प्रवेश केला, तर सात वाजून एक मिनिटांनी सूर्यकिरणांनी श्री क्षेत्र भुलेश्वर मूर्तीस स्पर्श केला. यावेळी मंदिरातील मूर्ती सोनेरी दिसू लागली, तेज इतके होते की, मंदिरातील गाभारा सोनेरी दिसू लागला. यावेळी भुलेश्वराचे मनमोहक रूप पाहून सगळ्यांच्याच डोळ्याचे पारणे फिटले. भुलेश्वर महाराज की जय, हर हर महादेवच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर, सात वाजून पाच मिनिटांनी सूर्यकिरण शिवलिंगापासून बाजूला गेले. सरासरी सूर्यनारायनाने बारा मिनिटे सोनेरी अभिषेक घातला.
श्री भुलेश्वर मंदिरामध्ये दरवर्षी किरणोत्सव दोन वेळी पाहावयास मिळतो. सप्टेंबर महिन्यामध्येही किरणोत्सव होतो. मात्र, दरवर्षी हा योग जुळून येईल, असे नसते. कारण सप्टेंबर महिना म्हणजे पावसाळ्याचे दिवस असतात. या काळामध्ये ढगाळ हवामान असते. यामुळे कधी-कधी सूर्य दिसतच नाही. त्यामुळे दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये किरणोत्सव होतोच, असे नाही. मात्र, २७ मार्च ते २९ मार्च असा सलग ३ दिवस किरणोत्सव असतो. मात्र, २८ मार्च रोजी सूर्यकिरण शिवलिंगावरती मधोमध पडतात. हा किरणोत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भक्त मोठ्या संख्येने गर्दी करतात. गतवर्षी जगभरात कोरोना या विषाणूजन्य आजाराने थैमान घातल्याने सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद असल्याने श्री भुलेश्वर मंदिरही बंद होते, म्हणून या वर्षी भुलेश्वर भक्तांनी किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली, तर याच काळात प्रदक्षिणा मार्गावर असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरही किरणोत्सव सुरू होता. श्री क्षेत्र भुलेश्वर महादेवाला कोरोनाचे संकट घालविण्यासाठी साकडे घातले.
भुलेश्वर (ता.पुरंदर) येथे श्री भुलेश्वरांच्या मूर्तीवर सूर्यकिरणांचा अभिषेक झाला.