सूर्यनारायणाने घेतले भुलेश्वराचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:13 AM2021-09-21T04:13:30+5:302021-09-21T04:13:30+5:30
भुलेश्वर ; शिल्पसौंदर्याचा उत्तम नमुना असणाऱ्या श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिरात सोमवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस सूर्याचा पहिला किरण भुलेश्वर मूर्ती ...
भुलेश्वर ; शिल्पसौंदर्याचा उत्तम नमुना असणाऱ्या श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिरात सोमवारी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस सूर्याचा पहिला किरण भुलेश्वर मूर्ती वरती पडला. सूर्यनारायणाने भुलेश्वराचे दर्शन घेतले. हे भुलेश्वराचे सोनेरी रुप पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. मात्र मंदिर बंद असल्याने किरणोत्सव पाहण्याचा योग परिसरातील भाविकांना आला नाही.
दर वर्षी मार्च महिन्यामध्ये सुद्धा २८ मार्च रोजी भुलेश्वर मंदिरात किरणोत्सव होतो. पण, त्यावेळी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ढगाळ वातावरण नसते. त्यामुळे सरासरी २० ते २५ मिनिटे किरणोत्सव चालतो. परंतु सप्टेंबर महिन्यात ढगाळ वातावरण असल्याने भुलेश्वरचा किरणोत्सव सहसा होत नाही. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने आज अवघे सातच मिनिटे किरणोत्सव झाला.
श्री भुलेश्वर देवस्थानचे पुजारी विजय गुरव म्हणाले की, सप्टेंबर महिन्यात सूर्यकिरण पिंडीपर्यंत येणे हा दुर्मिळ आहे. यापूर्वी २००२ साली असा योग आला होता. त्यानंतर २०१४ साली ३ वर्षांच्या फरकाने २०१७ साली, तर २ वर्षांच्या फरकाने किरणोत्सव झाला. तर यंदा देखील २ वर्षांच्या फरकाने सोमवारी सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी सूर्यकिरणांनी भुलेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला.
---------------------------------
फोटो ओळ - सूर्यनारायणाने सोमवारी सकाळी घेतले भुलेश्वराचे दर्शन.