TET Exam Scam| शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 05:58 PM2022-01-29T17:58:21+5:302022-01-29T17:58:58+5:30
खोडवेकर सध्या मंत्रालयातील कृषी विभागात उपसचिव आहेत...
पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam) गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने (cyber branch pune police) शालेय शिक्षण, क्रीडा विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर (sushil khodvekar) यांना शनिवारी ठाण्यातून अटक केली. मंत्रालयातील आयएसएस दर्जाच्या आधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. खोडवेकर सध्या मंत्रालयातील कृषी विभागात उपसचिव आहेत.
शिक्षक पात्रता परीक्षा २०१९-२० मधील गैरव्यवहार प्रकरणाचा पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे. याप्रकरणात शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जी. ए. साॅफ्टवेअर टेक्नोलाॅजीस कंपनीचा संचालक डाॅ. प्रीतिश देशमुख, माजी संचालक अश्विनीकुमार तसेच शिक्षण परिषदेचे तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे यांच्यासह ३० ते ३५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी-२०२०) गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासात सात हजार ८८० अपात्र उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले असून त्यांच्याकडून प्रत्येकी एक लाख ते अडीच लाख रुपये घेण्यात आले असून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर (वय ४३) गैरव्यवहार प्रकरणात सामील असल्याचे आढळून आले. खोडवेकर यांनी या प्रकरणात अटकेत असलेले आरोपी शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्याकडून अपात्र उमेदवारांना पात्र ठरविण्यासाठी पैसे घेतले, अशी माहिती शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी चौकशीत दिली. त्यानंतर याप्रकरणात खोडवेकर यांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
आरोग्य विभाग भरती परीक्षा, शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंत ३० ते ३५ जणांना अटक करण्यात आली आहे. या गैरव्यवहाराची व्याप्ती राज्यभरात पसरली आहे. याप्रकरणात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून दलालांना अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता गैरव्यवहार प्रकरणातील सात हजार ८८० अपात्र उमेदवारांची यादी शिक्षण विभाग तसेच राज्य शासनाकडे सादर करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त गुप्ता, सहआयुक्त डाॅ. रवींद्र शिसवे, उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त विजयकुमार पळसुले, सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके आदींनी ही कारवाई केली.
एका प्रकरणात राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांची चौकशी सुरू होती. याप्रकरणाची चौकशी शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर यांच्याकडे साेपविण्यात आली हाेती. त्याचा गैरफायदा खोडवेकर यांनी घेतला. सुपे यांच्यावर खोडवेकर यांनी दबाब टाकला. अपात्र उमेदवारांना पात्र करण्यासाठी सुपे यांना सांगण्यात आले, अशी माहिती तपासात निष्पन्न झाली आहे.